अकोला : शहरातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शहरात शिक्षणासाठी राहणाऱ्या बाहेर गावातील एका अल्पवयीन मुलीचा चालकाने धावत्या ऑटोमध्ये विनयभंग केला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील ऑटो चालकाने केला. मात्र, मोठ्या हिंमतीने मुलीने स्वत:ची सुटका करून घेत थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ ऑटो चालकाला गजाआड केले. जाफर खान सुभेदार खान (रा.नवेगाव, अकोला.) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

अकोला शहरात बाहेर गावावरून विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात. परतवाडा येथील एक १६ वर्षीय विद्यार्थिनी नीटच्या शिकवणी वर्गासाठी शहरात भाड्याच्या खोलीत राहते. ती आजारी असल्याने परतवाडा येथे गेली होती. शुक्रवारी सायंकाळी बसने ती अकोल्यात परतली. बसस्थानकावरून आपल्या खोलीवर जाण्यासाठी ती एका ऑटोरिक्षामध्ये बसली. ऑटो बसस्थानकावरून निघाला. चालकाने ऑटो वेगळ्याच मार्गाने नेण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीला संशय आले. मुलीने प्रसंगावधान राखत आपल्या मित्राशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मुलगी हा प्रकार सांगत असतांनाच ऑटो चालकाने मुलीचा हात पकडून स्वतःजवळ ओढले. मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीने प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या डाव्या हातावर आणि हाताच्या दंडाला चावा घेतला. झटपट करून अल्पवयीन मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली.

पीडित मुलीने थेट सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले. घडलेली माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने ऑटो रिक्षा चालकाचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. मुलीने ऑटोचा क्रमांक देखील दिला. त्यामुळे पोलिसांना ऑटो चालकाचा शोध घेण्यास मोठी मदत मिळाली. एमएच ३० ई ९४९७ या क्रमांकाचा ऑटो देखील पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी कलम ७४, ११८ (१), १३७ (२) बीएन सहकलम ८ पोक्सोनुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रहार आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अगोदरही ऑटो चालकाकडून अत्याचार

बसस्थानकावर पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर तिच्या अंध पतीसमोरच ऑटो चालकाने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ३१ मार्च २०२३ रोजी घडला होता. गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली होती. ऑटो चालकांची गुन्हेगारी व दादागिरी वाढत चालल्याचे चित्र आहे.