scorecardresearch

महाराष्ट्रातील वलयांकित वाघ नेमके गेले कुठे?; मृत्यू की शिकार हे गुलदस्त्सात; वनखात्याकडे नोंदच नसल्याने संभ्रम

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने १४ महिन्यांत ३ हजार १७ किलोमीटरचा प्रवास केला

tigers missing in maharashtra
महाराष्ट्रातील वाघ

नागपूर : महाराष्ट्रातील वाघांनी जागतिक पातळीवर आपली विशेष ओळख निर्माण करून वनखात्याला भरघोस महसूल मिळवून दिला. मात्र, नंतर हे वाघ लुप्त झाले. त्यांचा मृत्यू झाला की कसे, याबाबत वन खात्याच्या दरबारी नोंदच नाही. तीन हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करणारा ‘वॉकर’, अवघ्या पावणेदोन वर्षांचा असताना रानगव्याची शिकार करणारा ‘जय’, कळमेश्वरच्या राखीव जंगलातील ‘नवाब’ आणि आता ताडोबाची राणी ‘माया’, असे हे दुर्दैवी वर्तुळ आहे.

 वाघांना त्याचे आयुष्य नैसर्गिकरित्या जगू न देता त्यांची सतत प्रसिद्धी करत राहणे, हेच वाघांसाठी धोकादायक ठरत असल्याचे महाराष्ट्रातील अलीकडच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. वाघांच्या नावावर अर्थकारण, रिसॉर्टचालक, पर्यटक मार्गदर्शक असे सारेच त्यासाठी जबाबदार आहेत. वाघांना त्यांच्या नोंदणीकृत नावांऐवजी विशेष नामकरण केलेल्या नावाने ओळख देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर अंकुश लावण्यात खात्यालाही अपयश आले. परिणामी, पर्यटकांचा ओढा या वलयांकित वाघांकडेच अधिक राहिला. त्यामुळे अतिपर्यटन या वाघांना त्यांचा अधिवास सोडण्यास भाग पाडत नाही ना, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून विचारला जात आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात स्कूल बस चालक ठार

‘वॉकर’

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील या वाघाने १४ महिन्यांत ३ हजार १७ किलोमीटरचा प्रवास केला. औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि तेलंगणजवळील अदिलाबादपर्यंत त्याची मुशाफिरी होती. मार्च २०२० ला त्याच्या रेडिओ कॉलरची बॅटरी संपली. बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य त्याचे शेवटचे ठिकाण होते.

‘जय’

नागझिरा अभयारण्यात ‘माई’ या वाघिणीच्या पोटी जन्मलेल्या ‘जय’ या वाघाने अवघ्या पावणेदोन वर्षांचा असताना याच अभयारण्यात रानगव्याची शिकार केली. त्यानंतर तो उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरित झाला. ‘जय’ कधीही शिकाऱ्यांच्या तावडीत सापडू शकतो, यासाठी लाखो रुपये खर्चन त्याला ‘सॅटेलाइट रेडिओ कॉलर’ लावण्यात आले. एप्रिल २०१६ पासून त्याचा पत्ताच लागलेला नाही.

‘नवाब’

कळमेश्वर-कोंढाळी राखीव जंगलातील वाघाने ‘नवाब’ म्हणून ओळख निर्माण केली. या वाघाने दोन वर्षे सहा महिन्यांचा असताना स्थलांतर केले. सुमारे १०० ते १२० किलोमीटरचे अंतर पार करून अमरावती जिल्ह्यमतील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात तो पोहरा-मालखेडचा ‘राजा’ झाला. मात्र, सध्या त्याच्या अस्तित्वाची कल्पना कुणालाही नाही.

‘माया’

पांढरपौनी भागात आपल्या बछडय़ांसह भटकणारी ‘माया’ ही वाघीण पर्यटकांना कधीच निराश करीत नाही आणि म्हणूनच ताडोबाची राणी अशीही तिची ओळख. १३ वर्षांच्या मायाने पाचवेळा बछडय़ांना जन्म दिला आणि ती सातत्याने बछडय़ांसोबत दिसून आली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील माया जगप्रसिद्ध असून तिचे लाखो चाहते आहेत. ऑगस्ट २०२३ पासून ती बेपत्ता आहे.

वाघांची प्रसिद्धी करणे हेच चुकीचे आहे. प्रसिद्धी करायचीच असेल तर अशा  वाघांच्या देखरेखीसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. या  वाघांचा अधिवास पूर्णवेळ पर्यटनासाठी खुला न ठेवता काही काळासाठी तो बंद ठेवायला हवा. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमांचे पालन व्हायला हवे. अन्यथा, वाघांचे बेपत्ता होणे थांबणार नाही. – यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tigers missing in maharashtra no record with the forest department zws

First published on: 21-11-2023 at 02:38 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×