अमरावती : राज्‍यात गेल्‍या हंगामापासून हरभरा दर दबावात आहेत. हरभरा डाळ आणि बेसणाला मागणी वाढूनही दरात सुधारणा झाली नाही. याचा परिणाम पेरणीवर होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होत होता, पण यंदा रब्‍बी हंगामात हरभरा पेरा गेल्‍या वर्षीपेक्षा जास्‍त झाला आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्‍या माहितीनुसार रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ७ लाख ४६ हजार ३९६ हेक्टर इतके आहे. त्यातुलनेत सद्यस्थितीत ६ लाख ९९ हजार १६ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही टक्केवारी ९४ इतकी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विभागात हरभऱ्याचे लागवडीखालील सरासरी क्षेत्र ५ लाख २७ हजार ३८८ हेक्‍टर असून आतापर्यंत सरासरीहून अधिक म्‍हणजे ५ लाख ३५ हजार हेक्‍टरमध्‍ये (१०२ टक्‍के) हरभरा पेरणी झाली आहे. गव्‍हाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ४२७ हेक्‍टर असून १ लाख ३३ हजार ५८६ हेक्‍टर म्‍हणजे ७३ टक्‍के क्षेत्रात गव्‍हाचा पेरा झाला आहे. रब्‍बी ज्‍वारीच्‍या १७ हजार ३९० सरासरी क्षेत्राच्‍या तुलनेत १५ हजार २०७ (८७ टक्‍के) क्षेत्रात ज्‍वारीची पेरणी झाली आहे.

हेही वाचा : नागपूरला पळवलेले पशुधन मंडळाचे मुख्यालय अकोल्यात परतणार, नेमके कारण काय? वाचा…

दशकभरापुर्वी अमरावती विभागात रब्‍बी हंगामात तेलबियाचा मोठ्या प्रमाणात पेरा होत होता. मात्र काही वर्षांत तेलबियाची उत्पादकता घटली. तसेच हवामानातील बदल आणि वन्यप्राण्यांपासून या पिकाची होणारी नासधूस यामुळे सूर्यफुल, जवस, करडई याचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला. एकूणच पेऱ्याचे प्रमाण घटल्याने स्थानिक तेलघाणे आणि छोट्या मोठ्या तेल निर्मिती करणाऱ्या मिलवर याचा परिणाम झाला. यंदा तेलबीयांचे क्षेत्र किंचित वाढले आहे.

विभागात रब्‍बीचे तेलबियांचे सरासरी लागवडीचे क्षेत्र २ हजार २९७ हेक्‍टर असून यंदा आतापर्यंत ३ हजार ४९६ हेक्‍टरमध्‍ये तेलबियांची लागवड करण्‍यात आली आहे. करडईच्‍या सरासरी ८३४ हेक्‍टरच्‍या तुलनेत २५०९ हेक्‍टर म्‍हणजे ३०१ टक्‍के क्षेत्रात पेरा झाला आहे. जवस लागवडीचे सरासरी क्षेत्र केवळ १ हेक्‍टर असताना यंदा ७८ हेक्‍टरमध्‍ये पेरा झाला आहे. सूर्यफुल १०१ हेक्‍टरमध्‍ये म्‍हणजे ११५ टक्‍के क्षेत्रात, तसेच इतर तेलबियांची लागवड २७५० हेक्‍टरमध्‍ये करण्‍यात आली आहे.

हेही वाचा : अकोला : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवा २०८ कोटींचा निधी, अवकाळीच्या तडाख्याने १.८८ लाख हेक्टरवरील पिके मातीत; भरपाईची प्रतीक्षाच

दहा वर्षांपुर्वी सूर्यफुलाचे लागवडीचे क्षेत्र २ हजार ९०० हेक्‍टर होते, ते आता ७९ हेक्‍टरवर आले आहे. शेतकऱ्यांचा कल गहू व हरभरा पेरणीकडे जास्त आहे. सिंचन प्रकल्पांमध्‍ये पुरेसा जलसाठा आहे. त्यामुळे रब्बीसाठी आठ ते दहा पाळ्यांमध्ये सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. याशिवाय भूजलस्तरात वाढ झाल्याने विहिरींद्वारेही सिंचन होणार आहेत. किमान ९० टक्के क्षेत्रात गहू व हरभराची पेरणी होत असल्याने अन्य पिके कालबाह्य ठरू लागली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati division harbara sowing above average rabi crops sowing on 94 percent area completed mma 73 css
First published on: 21-12-2023 at 12:13 IST