भंडारा : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थी शहरातील शाळा- महाविद्यालयांमध्ये एसटी महामंडळाच्या बसने नियमित ये-जा करत असतात.

दरम्यान शाळेतून गावाकडे परत येत असलेल्या एका शालेय विद्यार्थिनीला एसटीच्या एका महिला वाहकाने चक्क केस खेचून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संताप जनक प्रकाराचे चित्रीकरण काही ग्रामस्थांनी केले. त्यानंतर एसटी बस थांबवून संतप्त गावकऱ्यांनी महिला वाहकाला तिच्या वागण्याचा जाब विचारला. या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट पोलीस ठाणे गाठले आणि महिला वाहकावर कारवाईची मागणी केली आहे.

मागील काही दिवसात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे अनेक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे काही महिला वाहक भलतेच धाडस करण्यास धजावत असून या महिला वाहकांना कुणाचाही धाक नसल्याचे दिसून येत आहे. असाच एक संताप जनक प्रकार काल एका महिला वाहकाकडून घडला.

भंडारा डेपोची बस भंडारा येथून करडीकडे जात होती. या एसटी बसमध्ये प्रवाशांसह अनेक शालेय विद्यार्थिनी देखील होत्या. दरम्यान सुरेवाडा बस स्थानकावर बस थांबल्यानंतर विद्यार्थिनीच्या शालेय पासच्या शुल्लक कारणावरून एका महिला वाहकाने विद्यार्थिनीचा हात पकडून तिच्याशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला मात्र या विद्यार्थिनीने हात झटकून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता या महिला वाहकाने चक्क विद्यार्थिनीचे केस खेचून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बघून प्रवासी देखील थक्क झाले. महिला वाहक या विद्यार्थिनींचे केस खेचून तिला ओढत असताना विद्यार्थिनी वेदनेने रडू लागली मात्र या महिला वाहकाला पाझर फुटला नाही. अखेर तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या महिला वाहकाचा हात धरून तिच्या तावडीतून विद्यार्थिनीची सुटका केली.

या घटनेनंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी एसटी थांबवून महिला वाहकाला खाली उतरवले आणि तिने विद्यार्थिनी सोबत केलेल्या वर्तनाबाबत जाब विचारू लागले. विद्यार्थिनीचे काही चुकले असेल तर तिला समज देता येईल किंवा तिची तक्रार करता आली असती मात्र तिचे केस ओढून तिला शारीरिक इजा पोहोचविण्याचा अधिकार महिला वाहकाला आहे का असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला. एवढ झाल्यानंतरही या महिला वाहकाने तिचा हेका कायम ठेवला. त्यानंतर महिला वाहक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थिनींच्या पालकांसह थेट कारधा पोलीस स्टेशन गाठले. कारधा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विचारणा करण्यासाठी विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कारधा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुभाष राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेवाडा येथील विद्यार्थिनी आणि एसटीच्या महिला वाहकामध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. विद्यार्थिनीचा शालेय पास संदर्भात काहीतरी घोळ झाला होता. महिला वाहकाने तिला विचारणा केली असता विद्यार्थिनीने महिला वाहकाजवळ असलेली तिकीट मशीन ओढून येण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असलेल्या महिला वाहकाच्या मशीनमध्ये कोणताही बिघाड झाला असता तर तिला त्याचे भुर्दंड भोगावे लागले असते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला वाहकाने रागाच्या भरात विद्यार्थिनीचे केस खेचून तिला रोखण्याचा प्रयत्न केला, असे महिला वाहकाने तिच्या बयानात सांगितले आहे.

कारधा पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या महिला वाहक आणि सुरेवाडा येथील ग्रामस्थ सरपंच आणि पालक यांनी आपापली बाजू ठाणेदार सूर्यवंशी यांच्यासमोर मांडली. महिला वाहक आणि विद्यार्थिनी या दोघींनीही एकमेकींविरोधात तक्रार केल्यास दोघींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार यांनी सांगितले. मात्र कारवाईच्या भीतीने महिला वाहक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार करण्याचे माघार घेतली. यापुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याची समज ठाणेदार सूर्यवंशी यांनी दोघींना दिली. कर्तव्यावर असताना शासकीय कर्मचाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्य बजावणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेची तक्रार केलेली नसली तरी सुरेवाडा ग्रामस्थांकडून विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांना महिला वाहकाच्या विरोधात निवेदन देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवात करण्याची पूजा करून त्यांना योग्य तो सन्मान दिला जातो असे असताना एका महिला वाहकानेच एका कन्येला अशी असभ्य वागणूक देणे हे निंदनीय आहे. कर्तव्यावर असताना महिला वाहक जर असे वागत असेल तर वरिष्ठांनी त्यांचे स्थानांतरण करून त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी प्रतिक्रिया एसटी महामंडळ भंडारा समितीचे सदस्य विजय क्षीरसागर यांनी दिली आहे.