चंद्रपूर : व्हिडिओ गेम खेळणाऱ्या नीरज मेश्राम या युवकाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याबाबत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले आहेत. जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांच्या बैठकीत ते बोलत होते.

हेही वाचा : चंद्रपूर : श्रीगणेश विसर्जनाची तयारी पूर्ण; ईरई धरणातून अतिरिक्त पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)दगडू कुंभार, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, विधी अधिकारी राजेश दुबे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, व्हिडीओ गेम पार्लरबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच वरोरा येथे व्हिडीओ गेम खेळून पैसे हरल्याने एका युवकाने आत्महत्या केली, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही. परवानाधारकांनी परवान्यातील अटी व शर्तीनुसारच गेम पार्लर चालवावे. जुगार खेळता कामा नये. तसे आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.