चंद्रपूर : वरोरा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मांसाहार पार्टीत दोन मद्यधुंद कार्यकर्ते विहिरीत पडले. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उमेदवार मतदारांना मांसाहारी व शाकाहारी पार्टी, दारू पार्टीचे प्रलोभन देत आहेत. ग्रामीण व शहरी भागात अशा पार्टी दररोज आयोजित केल्या जात आहेत. जेवणावळीची धूमधाम सुरू असताना कार्यकर्ते दारूच्या नशेत झिंगून पडत असल्याची घटना समोर आली आहे. वरोरा मतदार संघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांच्यासाठी त्यांचे समर्थक प्रमोद मगरे यांनी रविवारी मटण-चिकन पार्टीचे आयोजन केले होते. फतेहपूरच्या गिट्टी क्रशर कॉम्प्लेक्समध्ये मटण पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये दारूचीही व्यवस्था करण्यात आली होती. पार्टीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन कार्यकर्त्यांचा तोल गेला आणि ते जवळच्या विहिरीत पडले.
हे ही वाचा… ‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
अरुण महाले या एका कामगाराची वेळीच सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र दुसरा कामगार गजानन काळे अद्याप बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून मदत आणि बचावकार्य सुरू आहे, मात्र रात्रीचा अंधार असल्याने त्यांना विहिरीतून बाहेर काढता आले नाही. परिणामी त्याचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून प्रचाराला गालबोट लागले आहे.