गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात रविवार मध्यरात्री पासून विजेच्या कडकडाटासह पावंसाचा जोर वाढला आहे. आज एका झाडावर वीज कोसळल्याने धावत्या दुचाकीवर झाड पडून दुचाकीस्वार वडिलांचा मृत्यू तर दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला ही घटना गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील सातोना-बोपेसर मार्गावर सोमवारी, ७ जुलै रोजी सकाळच्या सुमारास घडली. जीवचंद यादोराव बिसेन (४६) असे मृत वडिलाचे तर चिराग जीवचंद बिसेन (१६) असे या घटनेतील गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जीवचंद बिसेन हे वडेगाव येथील रहिवासी असून मुलगा चिराग यास शाळेत सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच ३५ एपी ९३७० ने तिरोडाकडे जात होते. यावेळी अचानक सातोना-बोपेसर गावाजवळ रस्त्याच्या कडेवरील करंजीच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे झाड रस्त्यावर धावत असलेल्या दुचाकीवर कोसळला. या झाडाखाली दबल्याने जीवचंद बिसेन यांचा जागीच मृत्यू झाला तर चिराग हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर तिरोडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्या नंतर त्याच्यावर सध्या गोंदिया येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची नोंद तिरोडा पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
आज, उद्या मुसळधार
गोंदिया जिल्ह्यात गेल्या ३-४ दिवसां पासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान खात्याने एक अलर्ट माहिती जारी केली आहे, ज्यामध्ये आज सोमवार आणि उद्या मंगळवार असे ७ आणि ८ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शविली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, ७ आणि ८ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी नद्या, ओढे आणि तलावांपासून दूर राहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा बाहेर पडणे टाळा. प्रादेशिक हवामान खात्याने पुढील ७ दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट आणि ९ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. १० आणि ११ जुलै रोजी अनेक ठिकाणी पावसाचे संकेत आहेत. जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि नद्या आणि ओढ्यांजवळ जाणे टाळावे असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले आहे.