नागपूर: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, मेंढपाळ व मच्छिमारांचे प्रश्न, ग्रामसेवकांचे प्रश्न यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ट्रॅक्टर मोर्चा काढत नागपुरात आंदोलन केले होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही तीन दिवस नागपुरात आंदाेलन केले. सरकारने आमच्याशी चर्चा करून ३० जून २०२६पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले; परंतु साेशल मीडियावर शेतकरी आंदाेलनास ट्राेल करण्यात येत आहे. भाजपची मंडळी शेतकरी आंदाेलनास बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आराेप बच्चू कडू यांनी केला. आता अशातच सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर असलेले वर्धा येथील नितेश कराळे आणि रविराज साबळे दोघेही बच्चू कडूंच्या आंदोलन मागे घेण्यावरून एकमेकांविरोधात भिडले आहेत.

नेमके प्रकरण काय?

नागपूरमध्ये झालेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला अनेक शेतकरी नेत्यांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये नितेश कराळे यांचे समावेश होता. शेतकरी आंदोलनात त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला होता. बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतल्यावर समाज माध्यमांवर काही लोकांनी टीका करण्यास सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा ते गुवाहाटीला गेले होते. यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. या सरकारमध्ये बच्चू कडू यांचाही समावेश होता. सरकार स्थापनेच्या काही दिवसानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांनी बच्चू कडू हे त्यांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेले होते अशी माहिती दिली.

आता बच्चू कडू यांनी सरकारसोबत चर्चा केल्यावर आंदोलन मागे घेताच सोशल मीडियावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा तो जुना व्हिडिओ व्हायरल करून बच्चू कडूंचे आंदोलन मॅनेज झाले असा आरोप केला जात आहे. रविराज साबळे यांनीही या संदर्भात एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ नितेश कराळे यांना खटकला असून त्यांनी रविराज साबळे यांचे विरोधात एक व्हिडिओ तयार केला. यावरून दोघांमध्ये जुंपली आहे.

व्हिडिओमध्ये नेमके काय?

नितेश कराळे यांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर दिलेले आहे. बच्चू कडू यांचे आंदोलन कसे झाले, का करण्यात आले तसेच सरकारसोबत कुठल्याही वाटाघाटी न करता कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनच आंदोलन मागे घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. तसेच साबळेंच्या टिकेलाही त्यांनी उत्तर दिले. मात्र रविराज साबळे यांनी कराडे मास्तर यांना सडेतोड उत्तर देत शेतकऱ्यांच्या नावावर कशाप्रकारे राजकारण केले जात आहे हे आपल्या व्हिडिओ मधून सांगितले. यात शेतामध्ये वांगे कसे पिकवले जातात हेही कळत नसणाऱ्यांनी व्हिडिओ बनवू नये, असा सल्ला दोघे एकमेकांना देताना दिसत आहेत.