नागपूर : राज्यात महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण ही योजना नाही तर ती लाडकी खुर्ची योजना आहे. १ कोटी १३ लाख ३२३ महिलांना याचा लाभ मिळणार असून ५ कोटी महिला मात्र वंचित राहणार आहेत. देवा भाऊ, नाथ एकनाथ, दादा असे तिघेही या योजनेचे श्रेय घेत असले तिन्ही भाऊ लबाड आहेत. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्याच्या बैठकीच्या निमित्ताने भास्कर जाधव नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने महिला, शेतकरी आणि युवकांसाठी विविध योजना जाहीर केल्या तरी सर्व योजनाचा त्यांना निवडणुकीत काहीच फायदा होणार नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. हे तीनही भाऊ लबाड आहे. बहिणी यांना भाऊ मानायला तयार नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होणार हे निश्चित असल्याचे जाधव म्हणाले.

हेही वाचा : चंद्रपूर: पाच गुराख्यांचा बळी घेतला, अखेर शार्प शुटरने पहाटेच…

विदर्भाचा संपर्क नेता म्हणून निवड झाल्यानंतर जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांचा बैठकी घेत आहे. विदर्भातून कुठले उमेदवार द्यावे याबाबत चर्चा करुन चाचपणी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत रामटेकची जागा आम्ही उदार अंतकरणाने काँग्रेससाठी सोडली होती. पूर्व विदर्भात २८ जागा आम्ही लढल्या होत्या. त्यातील काही जागा काँग्रेसकडे असल्या तरी नैसर्गिक दृष्ट्या त्यातील ८ ते १० मतदारसंघ आम्हाला परत मिळावे अशी आमची मागणी आहे. आज सळसळत्या रक्ताचा शिवसैनिक विदर्भात आहे, म्हणून त्या आठ ते १० जागा परत मिळाल्या पाहिजे असी मागणी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, उमरेड, हिंगणा, दक्षिण नागपूर आणि पूर्व नागपूर या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत.

हेही वाचा : अकोला : अतिवृष्टीमुळे ५७ हजार हेक्टरवरील पिके मातीत; ऐन सणासदीच्या काळात….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चर्चेतून या सगळ्या जागांवर आम्ही दावा केला असल्याचे जाधव म्हणाले. मी जागा वाटप समिती मध्ये नाही, त्यात हस्तक्षेप करत नाही, २६ जागा दिल्या आहेत, ५६ विधानसभा मतदार संघावर आमचे लक्ष आहे, ५६ पैकी ३६ जागा निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे जाधव म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या जागांबाबत चिंता करु नये. जागा वाटपाचे काम आम्ही आंबेडकर यांना दिले नाही आणि त्यांच्या जागा वाटपाचे काम आम्ही घेतले नाही. त्यामुळे आमचे आम्ही बघून घेऊ असेही जाधव म्हणाले. उद्धव ठाकरे उद्या रविवारी घनश्याम मक्कासरे यांच्या संस्थेत शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाला येत आहे. वेळ मिळाल्यास नागपूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी संवाद साधतील असेही जाधव म्हणाले.