नागपूर : महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर मंत्रीमंडळात समावेश नसल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार नाराज आहे. त्यांची पक्षातून विविध पद्धतीने कोंडी केली जात आहे. दरम्यान नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे गटातून प्रवेशाच्या ऑफरसह इतर मुद्यांवर मत व्यक्त केले.
नागपूर विमानतळावर मुनगंटीवार म्हणाले, मी काही नाराज नाही आणि माझी पक्षातून कोंडीही केली जात नाही. अधिवेशनात गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यात काही गैर नाही. ते आमदाराचे कर्तव्यच असते. प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असे होत नाही. दुसरीकडे मंत्री नाही म्हणून प्रश्न मांडणे हेसुद्धा चुकीचे नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. महायुतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वनमंत्री आणि सास्कृतिक खाते त्यांच्याकडे होते. भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष राहिले. हे बघता महायुतीचे सरकार आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांचा पहिल्या पाचमंत्र्यांमध्ये राहील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, मुनगंटीवार यांना डावलले गेले. त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. त्यामुळे मुनगंटीवार पक्षाच्या निर्णयावर नाराज आहेत असे बोलले जात होते.
दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांना भाजपात प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतरही भाजपच्या नेत्यांनी प्रवेश दिला आणि चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांच्या निधीतून नाल्यावर बांधलेल्या भिंतीची मुद्दा उपस्थित केला. मित्राच्या बंगल्यासाठी ९५ लाखांचा निधी त्यांनी खर्च केला, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केले. या भितींच्या बांधकामाची आणि गैरव्यवहाराची चौकशी समितीसुद्धा त्यांनी लावून घेतली आहे.
अधिवेशनात सरकार धारेवर…
मुनगंटीवार यांनी अलिकडेच अधिवेशनात कामजाच्या इंग्रजी भाषेतील मजकुरावरून सर्वांनाच धारेवर धरले होते. जे इंग्रजी भाषेसाठी आग्रही आहेत त्यांना सरकारने पासपोर्ट कढून लंडनला पाठवा अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली होती. ते विविध प्रश्न उपस्थित करून सरकारवर आपला राग काढत आहेत. मंत्रिपदापासून डावलल्यापासून मुनगंटीवार प्रत्येक अधिवेशनात सरकारला धारेवर धरत आहेत.
शिवसेनेकडून ऑफर काय?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना शिवसेना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांची स्थिती सध्या भाजपमध्ये चांगली नाही, त्यांनी शिवसेनेत यावे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते. तसेच दोन्ही ठाकरे एकत्र आले यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो, डोळ्याचे पारणं फिटो. वीस वर्ष लागले या कुटुंबाला एकत्र येण्यासाठी एका फ्रेममध्ये दिसण्यासाठी हा आनंद राज्याला साजरा करू द्या, अशी प्रतिक्रिया या मेळाव्यावर अंधारे यांनी दिली आहे.