नागपूर : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, या जागेसाठी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि आमदार आग्रही असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठींपुढे पेच निर्माण झाला आहे. आमदार विश्वजीत कदम यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आणि या जागेवर विशाल पाटील यांना संधी मिळावी यासाठी आग्रह धरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसोबत असल्याचे सांगून या जागेबाबत शिवसेनेने त्यांची तेथील शक्ती पाहून पुर्नविचार केल्यास काँग्रेस तयार असल्याचे सांगतिले. ते नागपुरात एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ते म्हणाले, सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराची तयारी नाही. ही बाब शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात यायला हवी. या जाणिवेतून समजा शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्यास काँग्रेसचा एबी फॉर्म तयार आहे. पण जर शिवसेनेला ती जागा लढवायची असेलतर आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस त्यांच्याबाजूने मजबुतीने उभे राहील. स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात येईल, असेही पटोले म्हणाले. आमदार विश्वजीत कदम, विशाल सावंत आणि पृथ्वीराज पाटील तिघांना महाविकास आघाडी सोबत राहण्याची सूचना काल करण्यात आली. सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचाच नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून माझाही हिरमोड झाला, अशी खंतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”

चंद्रहार पाटील आता शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. केंद्रातून मोदी आणि भाजपला दूर करण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे सांगलीतील जनता आणि कार्यकर्त्यांच्या भावना लभात घेऊन शिवसेनेने निर्णय घ्यायला हवे, असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला आहे. मात्र, शिवसेनेला ती जागा गेल्याने आणि ती त्यांनी लढवायचे ठरवले असल्यामुळे आम्ही त्यांना बळजबरी करू शकत नाही. त्यांनी त्यांचा उमेदवार कायम ठेवला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी

तिढा कायम

काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गट नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेससाठी सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते. जे उमेदवार म्हणून समोर होते. ते नाराज आहेत. त्या नाराजीतून काही ती मंडळी ना काही कृती करू पाहत आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना चर्चा करण्यासाठी बोलावले होते. परंतु सांगलीचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील उपस्थिती राहिले नाही. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे. त्यादृष्टीने अजूनही आम्ही विशाल पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहोत