यवतमाळ : आठवड्यात ईद, गणेश विसर्जन आदी महत्वाचे उत्सव होत आहेत. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि प्रशासनावर असते. तीन, चार दिवस चालणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवर येणारा ताण कमी करण्यासाठी आता वन विभागातील कर्मचारीही पोलिसांसोबत बंदोबस्ताच्या कामी लागले आहेत. यवतमाळ वन विभागाने तसे आदेशच काढले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. बहुतांश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकी काढल्या जातात. शिवाय सोमवारी मुस्लीम समाज ईद ए मिलाद साजरी करणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन आणि ईद सणाच्या बंदोबस्ताचा मोठा ताण पोलिसांवर येणार आहे.
हे ही वाचा…नागपूर : आज, उद्या पावसाचा अंदाज, अनंत चतुर्दशीला मात्र…
जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी चार तालुके सर्वाधिक संवेदनशील आहे. उमरखेड, दिग्रस हे अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जातात. येथे यापूर्वी सण-उत्सवाच्या काळात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या संवेदनशील तालुका मुख्यालयी व ग्रामीण भागात विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे.
पोलिसांवरील बंदोबस्ताचा हा ताण कमी करण्यासाठी वन विभाग पोलिसांच्या मदतीला धावले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता मोठया प्रमाणात पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नेमण्यात कमतरता भासत असल्याने वनपाल व वनरक्षकांना पोलिसांसोबत बंदोबस्तासाठी ड्युटीवर नेमण्यात आले आहे. जिल्ह्यातील १०० वनपाल व वनरक्षकांची विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. आज रविवार १५ सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत वनरक्षकांची ही ड्युटी लावण्यात आली आहे. उपवनसंरक्षक यवतमाळ वन विभाग यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना या नियुक्तींसंदर्भात पत्र दिले. हे वनपाल व वनरक्षक आता पोलिसांसोबत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी मदत करणार असेल तरी या पाच दिवसांच्या काळात वन विभागाची सुरक्षा मात्र वाऱ्यावर राहणार असल्याची चर्चा वन विभागात आहे. पोलीस, वन विभाग आणि गृहरक्षक दल आता हातात हात घालून बंदोबस्त सांभाळणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
हे ही वाचा…वर्धा : अफलातून असहकार ! शासनाच्या ‘ वॉट्स अँप ग्रुप’मधून बाहेर पडणार
३३९ सार्वजनिक गणेश मंडळं
जिल्ह्यात दोन हजार ३३९ गणेश मंडळांनी बाप्पाची स्थापना केली आहे. सर्वाधिक गणपती ग्रामीण भागांमध्ये आहेत. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. प्रत्येक शहर व चौकातील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर आहे. सीसीटीव्ही, व्हिडीओ कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलिस तैनात केले जाणार आहे. गणपती मिरवणूक बंदोबस्तात सहा उपअधीक्षक, २२ पोलीस निरीक्षक, ५५ सहायक पोलीस निरीक्षक, ५२ पोलीस उपनिरीक्षक राहणार आहेत. त्यांच्या मदतीला दोन हजार पोलिस कर्मचारी, आरसीपी पथक, ४ स्ट्रायकिंग फोर्स, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक एक, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक ३०, चार एसआरपीएफ प्लाटून, ११०० पुरुष होमगार्ड, २०० महिला होमगार्ड असा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हे ही वाचा…अकोला : छायाकल्प चंद्रग्रहणासह सूपरमूनची पर्वणी
बीएनएसच्या कलम १६३ (१) या नुसार जिल्हा दंडाधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर शो व लेझर लाईटचा वापर करण्यास बंदी घातली आहे. नागरिकांनी सामाजिक एकोपा जपून कायदा व सुव्यवस्था सांभाळून गणेशोत्सव, गणेश विसर्जन व ईद साजरी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी केले आहे.