नागपूर : परिक्षेत नापास झाल्यानंतर शिक्षकाने गुणपत्रिका देण्यास नकार दिल्यामुळे नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने जुना ब्रिटीशकालीन पुलावरुन नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना कन्हानमध्ये उघडकीस आली. आयुष सुनील फाये (१७, रा. कन्हान) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचे लेखनिक म्हणून काम करणारे पोलीस हवालदार सुनील फाये यांचा लहान मुलगा आयुष (वय १७) हा केंद्रीय शाळा कामठी येथे अकरावी कॉमर्समध्ये शिक्षण घेत होता. मात्र, तो गणित विषयात नापास झाला होता. त्यामुळे त्याने पुन्हा परिक्षा देऊन एका विषयात उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अनुत्तीर्ण झाला होता.

सोमवारी सायंकाळी ७ वाजता घरासमोर आयूष मित्रासोबत क्रिकेट खेळला आणि आईला मित्राकडे जातो असे सांगून सायकल घेऊन निघाला. मुलगा घरी लवकर परत आला नाही. म्हणून त्याच्या मित्राकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध करण्यात आली. शेवटी काही युवकांनी नदीकडे जाऊन बघितले असता कन्हान नदीवरील जुना ब्रिटिश काळीन पुलावर आयूषची सायकल पडलेली दिसली. त्यांनी नदीपात्रात शोध घेतला असता आयूषने पुलावरून शांती घाटाच्या जवळील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. आयूषचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

या घटनेची माहिती मिळताच कन्हान, कामठी पोलीस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ कामठी पोलिसांच्या हद्दीत असल्याने कामठी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून ग्रामीण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवला. आयूषवर कन्हान नदीच्या शांतीघाटात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कामठी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नापास झाल्यामुळे नैराश्य

आयुषला एका विषयात नापास झाला होता. तो महाविद्यालयात गुणपत्रिका आणायला गेला होता. मात्र, प्राध्यापकाने त्याला निकाल न देता पालकाला आणल्यावर निकाल मिळेल, अशी तंबी दिली होती. त्यामुळे आयुषच्या मनात भीती निर्माण झाली. आयुष घरी परत आला. भीतीपोटी त्याने कन्हान नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कन्हानचे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी दिली.

पाल्याचे यश फक्त गुणांच्या आकडेवारीवर मोजण्याची वृत्त पालक वर्गांत निर्माण झाली आहे. परंतू, पाल्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्याची कुटुंबातील वागणूक, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव हे पालकांनी ओळखायला हवे. पाल्यांची मानसिकता पालकांनी लक्षात घ्यायला हवी. पाल्यांना प्रोत्साहन आणि भावनिक साद देण्याची गरज निर्माण झाली आहे.- प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ञ)