नागपूर: नागपूर शहराच्या स्थानिक राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख मुकेश रेवतकर यांनी आपल्या समर्थकांसह भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केल.
या सोहळ्यात पक्ष निरीक्षक राजेंद्रजी जैन, शहराध्यक्ष अनिल अहिरकर, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नानाभाऊ टाकसाळे, माजी मंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, भंडारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, महासचिव धनंजय दलाल, तसेच चंद्रकांत नायक, लक्ष्मण बालपंडे, ईश्वर कोल्हे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
मुकेश रेवतकर हे ‘दक्षिण नागपूर मधील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. रेवतकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे नागपूर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार ,असा विश्वास राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर वाढू लागले आहे. विरोधी पक्षातील कार्यकर्ते, नेते सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करीत आहे. रेवतकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रदेशाकडे याच अनुषंगाने बघितले जात आहे.