नागपूर : एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देणार, अशी जाहिरात चक्क फेसबुकवर टाकण्यात आली. आमिषाला बळी पडलेला एक युवक ८० हजार रुपये घेऊन महाराजबागजवळ आला. आरोपींनी रक्कम घेऊन त्याला बनावट नोटा दिल्या आणि चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. पैसे घेऊन पळून जात असताना आरडोओरड केल्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

सतीश गायकवाड (२९) रा. बुलडाणा, शब्बीर ऊर्फ मोनू शेख (२७) रा. हिंगणा रोड, शुभम प्रधान (२७) रा. एमआयडीसी, गौतम भलावी (२१) रा. एमआयडीसी आणि दोन अनोळखी युवक अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. यातील आरोपी सतीश यालासुद्धा आरोपींनी बनावट नोटा देऊन फसवले होते. त्याची गेलेली रक्कम परत देण्यासाठी आरोपींनी त्याला टोळीत सहभागी करून घेतले. तसेच शब्बीर, शुभम आणि गौतम हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

हेही वाचा : नागपुरात गडकरींनी अनेक उड्डाणपूल बांधले, पण शहराच्या हृदयस्थानी एक चूक…

कमी वेळेत झटपट पैसा कमाविण्यासाठी आरोपींनी शक्कल लढविली. बनावट नोटांचे बंडल त्यांनी खरेदी केले. एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये मिळतील अशी फेसबूकवर जाहिरात टाकली. झिंगाबाई टाकळी येथील फिर्यादी राहुल ठाकूर (३१) याचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. बुधवारी दुपारी त्याला फेसबूकवर एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये मिळतील, अशी जाहिरात दिसली. राहुलला उत्सुकता निर्माण झाली. त्याने जाहिरातीवरील मोबाईल नंबरवर फोन करून आरोपींशी चर्चा केली.

उपरोक्त जाहिरातीनुसार आम्ही रक्कम देण्यास तयार आहोत, असे आश्वासन आरोपींनी दिले. राहुलने ८० हजार रुपये देताच आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. आरोपींच्या ताब्यातून बनावट नोटा, मोबाईल, दुचाकी, घड्याळ, सोनसाखळी, चाकू आणि फिर्यादीकडून हिसकावलेले पैसे जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात विकास तिडके, चंद्रशेखर गौतम, प्रशांत भोयर यांनी केली.

हेही वाचा : वाशिम : वारंवार वीज जात असल्याने नागरिक संतापले, महामार्गच रोखून धरला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चाकूचा धाक दाखवत मारहाण

८० हजार रुपयांत सौदा पक्का झाला. राहुलने पैेशांची जुळवाजुळव केली. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास तो ८० हजार रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी महाराज बागेजवळ आला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने त्यांना पैसे दिले. रक्कम घेताच आरोपींनी त्याला चाकूचा धाक दाखवीत मारहाण केली तसेच त्याला खाली पाडले. त्याचवेळी जवळच असलेला राहुलचा मामा आणि त्याचा एक मित्र धावला. दरम्यान, गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आवाज ऐकून धाव घेतली आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान त्यांचा एक साथीदार पळून गेला.