नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावरील चकडोह (बाजारगाव) येथील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप कामगारांना जीव गमवावा लागला. सर्वाधिक कालावधीसाठी दुर्घटनामुक्त विस्फोटक कंपनीचा पुरस्कार सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला मिळाला होता. मग, दुर्घटनामुक्त कंपनीत अशी भयानक घटना कुणाच्या चुकीमुळे घडली, निष्पाप कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

१९९५ साली स्थापन झालेल्या सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राला आवश्यक असलेल्या विस्फोटकांची निर्मिती केली जाते. एका मोठ्या राजकीय पक्षाशी कंपनीच्या मालकाचा संबंध आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख मेट्रिक टन विस्फोटकांची निर्मिती कंपनीद्वारा केली जाते. मागील काही वर्षात कंपनीच्या आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. नॅशनल सेफ्टी काउंसिलद्वारा (एनएससी) २०१७ साली महाराष्ट्र सेफ्टी हा पुरस्कार कंपनीला प्राप्त झाला होता. पुरस्कार प्राप्त झाल्यावर लगेच पुढच्या वर्षी २०१८ साली कंपनीत एक छोटी दुर्घटना घडली. त्यानंतरही कंपनीमध्ये सुरक्षेच्यादृष्टीने काहीही पावले उचलण्यात आली नाही. आता घडलेली घटनाही सुरक्षेबाबत दुर्लक्ष केल्याचा परिणाम आहे असे सांगितले जात आहे. ‘घटना का घडली याबाबत चौकशी केली जात आहे. सध्यातरी लोकांचे जीव वाचवण्यावर कंपनीचा भर आहे’, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक आशीष श्रीवास्तव यांनी दिली. सुरक्षेत चूक झाली का? याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

हेही वाचा : सलीम कुत्ताप्रकरणी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटही आक्रमक; मंत्री भुसे म्हणाले, “हे तर देशद्रोह्यांचे उदात्तीकरण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परवानगी दिली पण तपासणी नाही!

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या वतीने (पेसो) विस्फोटके निर्माण करणाऱ्या उत्पादकांना मान्यता प्रदान केली जाते. एकूण आठ प्रकारची विस्फोटके निर्माण करण्याची परवानगी पेसोद्वारा दिली जाते. चकडोह (बाजारगाव) येथील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला चार विभागात विस्फोटके निर्माण करण्याची परवानगी दिली गेली आहे. यामध्ये पेंटाइरिथ्रीटोल टेट्रानायट्रेट (पीईटीएन), डिटोनेटर (क्लास ६), डेटोनेटिंग फ्युज आणि बूस्टर या चार प्रकारात कंपनीला परवानगी मिळालेली आहे. पेसोद्वारा केवळ परवानगी देताना संबंधित कंपनीची तपासणी केली जाते, यानंतर तपासणीच्या नावावर केवळ कागदोपत्री कारवाई होते, अशी माहिती पेसोच्या कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. पेसोमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांंशी वारंवार संपर्क करूनही याबाबत माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. सोलार कंपनीची शेवटची तपासणी कधी झाली, याबाबतही कुणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही.