नागपूर : विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या खूनांच्या घटना सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या घटनांमुळे अनेकांना आधी ड्रम आणि नंतर हनिमूनची धास्ती बसली होती. अशीच एक धक्कादायक घटना नागपुरातल्या वाठोडा भागात उघडकीस आली आहे. विवाहबाह्य संबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा उशीने श्वास बंद करून खून केला. नंतर तो झटका येऊन मरण पावल्याचा कांगावा केला. पण शवविच्छेदनाने बिंग फुटले. अन् हा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे आढळले. वाठोडा परिसरातल्या साईनाथ सोसायटी येथे घडलेल्या या घटनेमुळे नागपूर हादरले आहे.
चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. चंद्रसेनची पत्नी दिशा रामटेके हीने प्रियकर आसीफ राजा ईस्लाम अंसारी उर्फ राजा बाबू टायरवाला याच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्धांगवायूमुळे चंद्रसेन हा आधीच अंथरुणाला खिळला होता. शिवाया या दोघांना विवाहानंतर २ मुली आणि १ मुलगा अशी तीन आपत्येही आहेत. तरीही दिशाचे विवाहबाह्य संबंध होते. यची कुणकूण लागल्यापासून पती-पत्नीत वाद आणि भांडण सुरू होते.
आपल्या संबंधात पतीचा अडसर होत असल्याने दिशाने बाबू टायरवालाच्या मदतीने पती चंद्रसेनच्या खूनाचा कट रचला. या दोघांनी संगनमत करीत राहत्या घरी दुपारी २.३० ते ३.३० च्या सुमारास उशीच्या मदतीने चंद्रसेनचे नाक आणि तोंड दाबून त्याचा श्वास रोखून धरला. त्यामुळे चंद्रसेनचा मृत्यू झाला. तो निपचित पडल्याने तिने खोटा कांगावा करीत लोक गोळा केले. मात्र चंद्रसेनचा भाऊ संजय आणि वाठोडा पोलिसांना संशय आल्याने शुक्रवारी चंद्रसेनच्या मृतदेहाचे मेडिकलमध्ये शवविच्छेदन झाले. यात बळजबरीने श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचा अभिप्राय वैद्यकीय अहवालातून देण्यात आला. वाठोडा पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद खुनात केल्यानंतर पत्नी दिशाला ताब्यात घेऊन पोलीसांनी चौकशी केली. यात दिशाने प्रियकर राजा अंसारीच्या मदतीने चंद्रसेनचा खून केल्याची कबुली दिली.
इंदूर, मेरठच्या घटनेची पुनरावृत्ती
काही महिन्यांपूर्वी पतीसोबत मधुचंद्रासाठी गेलेल्या इंदूर येथील सोनम रघूवंशी या महिलेने प्रियकर राज कुशवाहच्या मदतीने पती राजा रघूवंशीचा मेघालय येथे खून केला होता. यापूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे मुस्कान रस्तोगी या महिलेने प्रियकर साहिल शुक्ला सोबत मिळून पती सौरभ राजपूतचा काटा काढला. नंतर तुकडे तुकडे करून त्याचा मृतदेहाचे ड्रममध्ये पुरला. या दोन घटनांनंतर अनेकांना आधी ड्रम आणि नंतर मधुचंद्राची धास्ती बसली होती. या घटना विस्मृतीतही जात नाहीत तोच नागपुरात त्याची पुनरावृत्ती झाल्याने आता विवाहच करावा, की नाही याची भिती बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.