अकोला: रेल्वेमध्ये विनातिकीट व नियमबाह्य प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांची मोठी डोकेदुखी असते. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने या विरोधात मोहीम उघडून कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल १.२४ लाख प्रकरणात १०.९२ कोटींचा महसूल जमा करण्यात आला.
भुसावळ विभागाने तिकीट तपासणी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत एप्रिल २०२५ मध्ये तिकीट तपासणीद्वारे विक्रमी १०.९२ कोटींचा महसूल प्राप्त केला. एप्रिल २०२५ मध्ये भुसावळ विभागाने तिकीट तपासणी क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केले. विभागात विविध गाड्यांमध्ये सातत्यपूर्ण आणि व्यापक तिकीट तपासणी मोहिम राबवून विनातिकीट प्रवास, अनियमित तिकिटे आणि प्रवास नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे केवळ महसूलात वाढ झाली नाही, तर प्रवाशांमध्ये प्रवास शिस्तीची भावना अधिक दृढ झाल्याचे रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून सांगण्यात आले.
प्रवाशांना अधिक सुसज्ज सेवा आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी भुसावळ विभाग नियमितपणे मेल, एक्सप्रेस, विशेष गाड्या आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. एप्रिलमध्ये विभागाने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. तिकीट तपासणीद्वारे विनातिकीट, अनधिकृत प्रवासाचा एकूण एक लाख २४ हजार प्रकरणांतून एकूण १०.९२ कोटींचा महसूल मिळवला. ही रक्कम भुसावळ विभागाच्या इतिहासातील सर्वाधिक मासिक महसूल आहे. एप्रिलसाठी निर्धारित उद्दिष्टापेक्षा १८ टक्के अधिक महसूल प्राप्त करण्यात आला. या कामगिरीमुळे मे २०२२ मध्ये मिळविलेल्या ९.९७ कोटींच्या मागील विक्रमापेक्षा ९५ लाख अधिक महसूल मिळवण्यात विभाग यशस्वी ठरला.
अनियमित प्रवासाची ५६ हजार प्रकरणे
एप्रिलमध्ये अनियमित प्रवासाची एकूण ५६ हजार प्रकरणे नोंदवली आहेत. त्यातून ३.४९ कोटीचा दंड वसूल, विनातिकीट प्रकरणांमधून ६८ हजार प्रकरणे त्यातून ७.४२ कोटीचा दंड वसूल आणि सामानाच्या बुक न केलेल्या एकूण १६० प्रकरणांमधून ४४ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवासासाठी योग्य आणि वैध तिकिटांसहच प्रवास करावा, त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येईल. तिकीट तपासणीच्या विशेष मोहिमेमुळे रेल्वे गाड्यांमधील नियमबाह्य प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे योग्य तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही, असे रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.