वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्ट भूमिका घेण्यात आघाडीवर असतात. कामाबाबत कोणाचीही मी गय करीत नाही, हे त्यांचे म्हणणे. तसेच स्वपक्षाच्याच नव्हे तर विरोधी पक्षाच्या भूमिकेचाही ते योग्य सन्मान राखतात. त्यांचीही विकास कामे मार्गी लावतात, असे त्यांच्याबाबत बोलल्या जात असते. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना तोच अनुभव आला आणि तत्पर दखल गडकरी यांनी घेतल्याबद्दल ते समाधानी झाले.

येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल येथील वणा नदीवर स्थानांतरीत करण्यात यावा या मागणीचे निवेदन आज नितीन गडकरी यांना राका नेते अतुल वांदिले यांनी प्रत्यक्ष भेटीत दिले. यावेळी नितीन गडकरी यांनी तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत त्वरित या पुलाबाबत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले व पूल उत्तम स्थितीत असल्यास तो वणा नदीवर स्थानातरीत करण्यात यावा,असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिले.त्याचप्रमाणे नांदगाव येथील उड्डाण पुलावर दोन वेळा पडलेल्या भगदाडा बाबत माहिती घेऊन अधिकाऱ्यांना या पुलावरील खड्ड्याबाबत बाबत कायमस्वरूपी तोडगा काढून दुरुस्त करावा व संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश दिले.

येथील राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयाजवळील लोखंडी पूल वणा नदीवर स्थानातरीत केल्यास वणा नदीवरील गाडगेबाबा समाधी व ५१ फूट उंचीच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे भाविकांना सोयीचे होणार आहे. जर या ठिकाणी शक्य नसल्यास राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड जवळ हा पूल स्थानातरीत केल्यास हायवेवर मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टळू शकतात. त्यामुळे हा पूल वणा नदीवर किंवा छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात यावा अशी मागणीवजा विनंती अतुल वांदिले यांनी गडकरी यांना भेटून केली. यावेळी गडकरी यांच्यासोबत अर्धा तास झालेल्या चर्चेत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष व मनसेचे राज्यचिटणीस हेमंत गडकरी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी अंदाजे तीन वर्षापूर्वी या उपजिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी पाहून पायी जाणाऱ्या व्यक्तीसाठी हा पूल तयार केला होता. परंतु आता या चौकात व कलोडे चौकात राष्ट्रीय महामार्ग कडून उड्डाणं पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे भविष्यात या पुलाचा कोणताही ऊपयोग नसल्याने हा पूल या ठिकाणावरुन उचलून वणा नदीवरील गाडगेबाबा समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर उभारला पाहिजे.नदीला पाणी असते. त्यामुळे असंख्य भाविकांना या परिसरातील ५१ फूट उंचीच्या श्री विठ्ठलाच्या व संत गाडगेबाबा यांच्या समाधीजवळ जाण्यास भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा तयार पूल जर या उपरोक्त जागेवर उभारल्यास असंख्य भाविकांची व नदीपल्याड अनेक गावातील जनतेची सोय होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी शक्य नसल्यास शहरातील अन्य कोणत्याही वर्दळीच्या जागेवर स्थानातरीत केल्यास जनतेची सोय होऊ शकते अशी मागणी राकाचे अतुल वांदिले यांनी केली. या मागणीची त्वरित दखल ना नितीनजी गडकरी यांनी घेतली. यावेळी मनसेचे राज्य चिटणीस हेमंत गडकरी,राकाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, दशरथ ठाकरे उपस्थित होते.