वाशीम : सध्या शिक्षणाचा बाजार भरला असून वाशीम जिल्ह्यात चक्क अनधिकृत शाळा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शाळा प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कुणीही या शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
रिसोड येथील मालेगाव रोडवरील विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेला शासनाची कुठलीही मान्यता नसताना, ही शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या होता. या शाळेला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देवून तपासणी केली. इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग शासनाची मान्यता नसताना देखील चालविण्यात येत असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार, हे आहे कारण…
हे वर्ग बंद करुन शाळेचे फलक काढून घेण्यास संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली. परंतु संस्थेने वर्ग सुरुच ठेवल्यामुळे या संस्थेविरुध्द रिसोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही येथे प्रवेश घेवू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे यांनी केले आहे.