यवतमाळ : राज्यातील महायुती ही महापापी असून, केवळ लुटण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासाठीच भाजपने येथील पक्ष फाेडले, आमदार, मुख्यमंत्री विकत घेतले. दिल्लीत बसून अमित शहा यांनी महाराष्ट्र हा उद्योगपती गौतम अदानीला विकला. या साैद्यात अडथळा नकाे, म्हणून पक्ष फाेडून साेयीच्या व्यक्तीच्या हाती महाराष्ट्राची सत्ता दिल्याचा घाणाघाती आराेप कन्हैया कुमार यांनी केला. आज गुरुवारी यवतमाळ येथे महाविकास आघाडी उमदेवाराच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

देशात आणि राज्यात धर्माच्या नावावर धंदा केला जात आहे. आम्ही आमचा धर्म वाचवू, पण आमची शेती, व्यापार, राेजगार तुम्ही वाचवणार का, असा प्रश्न त्यांनी यावेळी बोलताना केला. यवतमाळ जिल्हा हा येथील शेती, खनिज यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतरही या जिल्ह्याची अवस्था बकाल झाली आहे. येथे भाजपचे कमळाचे फूल उगवले अन् दहशत, गुंडागर्दीचे पीक येथे आले आहे. या सर्व समस्यांचे उत्तर मतदानाच्या दिवशी द्यायचे आहे, असे आवाहन डाॅ. कन्हैया कुमार यांनी केले.

हेही वाचा : मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…

शेतकऱ्यांच्या तुरीला भाव नाही, तिकडे डाळीचे दर दुप्पट केले आहेत. शेतकरी व नागरिक या दाेघांचीही लूट हे सरकार करत आहे. महागडे शिक्षण घेऊन राेजगार मिळत नाही. देशात मागील ४५ वर्षांत कधीच निर्माण झाली नाही, इतकी बेराेजगारी या दहा वर्षांत वाढली आहे. यावर उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी प्रत्येक मुद्दा धार्मिकतेकडे नेऊन वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत. आता हे संकट महाराष्ट्रातील संस्कृती व पंपरेवर आले आहे. परिवर्तनाची ज्याेत महाराष्ट्रातूनच पेटली जाणार आहे, कारण विदर्भ हा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची नर्सरी आहे. येथील समसा, समरसता विचारच येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे कन्हैया कुमार म्हणाले.

हेही वाचा : दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभेचे प्रास्ताविक माजी आमदार कीर्ती गांधी यांनी केले. सभेला खासदार संयज देशमुख, तेलंगणाचे आमदार डाॅ. ओम श्रीक्रिष्णा, माजी आमदार किर्ती गांधी, माजी आमदार ख्वाजा बेग, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर, अखिल भारतीय युुवक काॅंग्रेसचे सचिव असिल अली खान, जिल्हा बॅंक अध्यक्ष मनीष पाटील, शिवसेना (ठाकरे गट)विधानसभा संपर्कप्रमुख संताेष ढवळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम आदी उपस्थित हाेते.