नागपूर : वाघ स्थलांतरण मोहिमेअंतर्गत वाघांच्या स्थलांतरणाचा दुसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दुसरी वाघीण देखील जेरबंद करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातून पहिल्यांदा दोन वाघिणी राज्याबाहेर स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातून भारतातील कोणत्याही राज्यात होणारे हे वाघांचे पहिले आंतरराज्यीय स्थलांतर आहे.

ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या संख्येला पुरक आणि अनुवंशिक विविधता वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून दोन वाघिणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याने त्यासाठी परवानगी दिली. २० ऑक्टोबरला या प्रकल्पाची सुरुवात झाली आणि २६ ऑक्टोबरला ताडोबातून तीन वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. रेडिओ कॉलर लावल्यानंतर या वाघिणीला सिमिलीपाल येथे स्थलांतरित करण्यात आले. ही वाघीण आता त्या जंगलात स्थिरावली आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी, १३ नोव्हेंबरला ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून दुसऱ्या वाघिणीला देखील जेरबंद करण्यात आले. ओडिशा व महाराष्ट्र वनविभागाच्या पथकाने या दोन्ही मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या.

हेही वाचा…नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…

हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव रक्षक विवेक खांडेकर, ओडिशाचे मुख्य वन्यजीव रक्षक सुसंता नंदा, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर, उपसंचालक आनंद रेड्डी, पीयुषा जगताप, विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे, सिमिलीपालचे क्षेत्र संचालक प्रकाश गोगीनेनी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित केला जात आहे. दोन्ही वनखात्याचे जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव पशुवैद्यक या मोहिमेत सहभागी झाले होते.

सिमिलीपालमध्ये दहा ‘मेलेनिस्टिक’ वाघ

ओडिशातील सिमिलीपाल या व्याघ्रप्रकल्पात एक-दोन नाही तर तब्बल दहा ‘मेलेनिस्टिक’वाघांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे, ज्याठिकाणी देशातील सर्वच काळे म्हणजेच ‘मेलेनिस्टिक’ वाघ आहेत. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केले आहे. या व्याघ्रप्रकल्पाला त्याच्या अनुवंशिक रचनेमुळे एक वेगळे ‘कन्झर्वेशन क्लस्टर’ म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा…कामाला लागा आणि इतिहास घडवा भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात,‘…तर खैर नाही’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यास काय सांगतो?

बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस येथील पर्यावरणशास्त्रज्ञ उमा रामकृष्णन आणि त्यांचे विद्यार्थी विनय सागर यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये एक अभ्यास करण्यात आला. ‘ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेज क्यू’ या जनुकामुळे वाघाच्या शरीराच्या वरच्या भागाचा रंग गडद होतो. या अभ्यासानुसार, सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पातील वाघांमध्ये इतर वाघांच्या तुलनेत जीन्सचा प्रवाह खूपच मर्यादित आहे. परिणामी व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असेही या अभ्यासात संशोधकांनी म्हटले आहे.