यवतमाळ : सध्या बहुतांश कार्यालयात ऑनलाइन किंवा अॅपद्वारे हजेरी नोंदविली जाते. अशा अॅपच्या माध्यमातून हजेरी नोंदवताना येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत संचालित विविध आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांना मंगळवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. हजेरीसाठी अॅप उघडताच जे दिसले ते बघून अनेकांची भंबेरी उडाली.
आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळेत नियमित व वेळेवर उपस्थित राहण्यासाठी ‘एएमएस अॅप’ देण्यात आला आहे. या अॅपवर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर आपली उपस्थिती वेळेसह नोंदवितात. मंगळवारी मात्र विपरीत घडलं. अॅप उघडताच त्यावर थेट ‘पॉर्न’ दिसणे सुरू झाले. या प्रकाराने कर्मचारी भांबावले. महिला कर्मचारी लज्जित झाल्या. अखेर हे अॅप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला.
हेही वाचा : आगळावेगळा निरोप समारंभ! श्वान ग्रेसी आणि सिंबा यांना भावपूर्ण सेवानिवृत्ती
आदिवासी विकास विभागाने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. आश्रमशाळांवर विशेष लक्ष दिले जात आहे. येथील कर्मचाऱ्यांची हजेरी थेट ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घेतली जाते. यासाठी एएमएस अॅप वापरला जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने हा अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून ठेवला आहे. त्यावरचा क्यूआर कोड स्कॅन करून उपस्थितीची नोंद केली जाते. मंगळवारी सकाळी ७:३० वाजता पांढरकवडा येथे सकाळीच कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करत असताना त्यावर अश्लील चित्र दिसू लागले. या प्रकाराने कर्मचारी घाबरले. आपल्यासोबतच हे घडत आहे की, इतरांनाही या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे, यासाठी एकमेकांना विचारणा सुरू झाली.
हेही वाचा : खासदार रामदास तडस म्हणतात,’ बचत गट भवन हे’ या ‘ आमदाराचं देणं…’
तेव्हा सर्वांनाच हा मनस्ताप होत असल्याचे पुढे आले. त्यामुळे हॅकरने अॅप हॅक केल्याबाबत स्पष्ट झाले. याबाबत प्रकल्प अधिकारी कार्यालयाला तत्काळ सूचना देऊन हे अॅप बंद करण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे, केवळ पांढरकवडा प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडूनच कर्मचाऱ्यांना एएमएस अॅप देण्यात आला आहे. इतर कुठेही हजेरीसाठी असे अॅप वापरले जात नाही. प्रकल्प कार्यालयाने अॅप घेताना त्याच्या सुरक्षेबाबतही दक्षता घेणे गरजेचे होते. याची वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी आश्रमशाळा कर्मचारी संघटनेने केली आहे.