नागपूर : कर चोरी आणि आर्थिक अनियमितता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय झालेल्या प्राप्तिकर विभागाने सलग चौथ्या दिवशी मंगळवारी शहरातल्या आणखी एका समुहावर छापा टाकत उलाढालीच्या व्यवहारांशी निगडीत कागदपत्रांची तपासणी केली. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी कस्तुरचंद पार्क जवळच्या रायसोनी शैक्षणिक समुहाच्या श्रद्धा हाऊसवर इमारतीतील श्रद्धा आर्टिफिशियल इंटेलिजंस या कंपनीच्या कार्यालयावर हा छापा टाकला.
पथकातल्या ५ ते ६ अधिकाऱ्यांचे पथक सकाळी सातच्या सुमारास कार्यालयात धडकले. अधिकाऱ्यांनी सलग १२ तास कागदपत्रांची तपासणी केली. रायसोनी शैक्षणिक समुह मातृ संस्था असलेल्या या कंपनीच्या वार्षिक उलाढालीत आढळलेल्या त्रूटी आणि अनियमिततेमुळे प्राप्तिकर विभागाच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली श्रद्धा एआय ही रायसोनी समुहाची उपकंपनी आहे. तिने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंदात अनियमितता आढळल्याने ही प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत असून पथकाने या संदर्भात काही कागदपत्रेही सील केल्याची माहिती मिळत आहे. पथकाच्या या कारवाई दरम्यान श्रद्धा एआय कंपनीचे अंकेक्षण अधिकारी आणि लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचीही यावेळी चौकशी करण्यात आली. रायसोनी समुहाचे जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे यांनीही या छापा कारवाईला दुजोरा दिला. मात्र ही नियमीत तपासणी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राप्तिकर विभाग सक्रिय
कर चोरी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आठवडा भरात आधी पेट्रोलियम क्षेत्रातील गो गॅस कंपनीचे संचालक नितीन खारा यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. विभागाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (आय अँड सी. आय.) सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खामला येथील उप निबंधक कार्यालयात छापा टाकला होता. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई चालली. त्यापूर्वी याच प्रकरणात विभागाने काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स आणि रेशिमबाग येथील उप निबंधक कार्यालयातही झडती घेतली होती. एन दिवाळीच्या सणात सुरू असलेल्या या कारवाईमुळे कर चुकवणाऱ्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.