चंद्रपूर : गोळीबार, हत्या, पेट्रोलबॉम्ब हल्ला यांसह गुन्हेगारीच्या घटनांनी जिल्ह्यात कळसच गाठला आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालल्याने जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बल्लारपूरच्या ठाणेदाराला हटवण्याची मागणी केल्यानंतर तसे निर्देश स्वत: पालकमंत्र्यांना द्यावे लागले. यानंतर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सोमवारी जिल्हा पोलीस दलात खांदेपालट केली.

जुलै महिन्यात मनसे कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अमन अंधेवार यांच्यावर रघुवंशी संकुलात गोळीबार झाला होता. या गोळीबारात अंधेवार गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर बल्लारपूर शहरात कापड व्यावसायिक अभिषेक मालू यांच्या दुकानात पेट्रोलबॉम्ब हल्ला करण्यात आला. मालू यांना धमकावण्यासाठी बंदुकीचा वापर केला गेला. राजुरा येथे गोळीबारात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या सर्व घटना पाहता गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. बल्लारपूरच्या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांची बदली करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेख यांच्या बदलीचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले.

हेही वाचा – पूर्ववैमानस्यातून भंडाऱ्यात गोळीबार, भरवस्तीत बंदूक घेऊन फिरत होता हल्लेखोर

अधीक्षकांनी निरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश सोमवारी जाहीर केले. बल्लारपूरचे ठाणेदार असिफराजा शेख यांच्याकडे रामनगर ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर रामनगरचे ठाणेदार सुनील गाडे बल्लारपूरची सूत्रे स्वीकारतील. निरीक्षक प्रमोद बानबले ब्रह्मपुरी, निरीक्षक अमोल काचोरे नागभीड, विजय राठोड सिंदेवाही, राजकमल वाघमारे पोंभुर्णा, चिमूरचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र चांदे भिसी, जिल्हा विशेष शाखेचे सहायक निरीक्षक सचिन जगताप पडोली, बल्लारपूरचे सहायक निरीक्षक अमित पांडे माजरी, स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक निरीक्षक योगेश खरसान कोठारी, निरीक्षक बबन पुसाटे नियंत्रण कक्ष, निरीक्षक निशिकांत रामटेके पोलीस उपअधीक्षक मुख्यालय, निरीक्षक प्रकाश राऊत दुय्यम अधिकारी, राजुरा पोलीस ठाणे, निरीक्षक श्याम गव्हाणे जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि सुरक्षा शाखा, निरीक्षक संदीप ऐकाडे पोलीस कल्याण, सायबर आणि अर्ज शाखा, तर कोठारीचे ठाणेदार आशीष बोरकर यांच्याकडे गडचांदूर ठाण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. वरोराचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांना कायम ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी केलेल्या या बदल्यांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसतो का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

पोलीस निरीक्षक गाडेंच्या बदलीमागे राजकीय दबाव?

रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुखांना अटक करून त्यांच्याकडून ४० जिवंत काडतुसे आणि एक अग्निशस्त्र जप्त केले. या प्रकरणात आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. असे असतानाही गाडे यांची बल्लारपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. राजकीय दबावातून ही बदली करण्यात आल्याची चर्चा दबक्या आवाजात जिल्ह्यात सुरू आहे.

हेही वाचा – खते, अवजारांवरील ‘जीएसटी’मुळे शेतीवर आर्थिक ताण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवासेना शहर प्रमुखाकडून पिस्तूल जप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्याकडून ४० जिवंत काडतुसे, तलवार, वाघनखं जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी सहारे याने भावाच्या मदतीने युवासेना शहरप्रमुख शहाबाज सुबराती शेख याच्याकडे पिस्तूल लपवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करीत शेख, विशाल ऊर्फ विक्की सहारे, पवन नगराळे या तिघांना अटक केली. सहारेकडे सापडलेली काडतुसे बिहार येथून आणण्यात आली होती. यानंतर अग्निशस्त्राचा शोध घेण्याचे मोठे आव्हान रामनगर पोलिसांसमोर होते. याप्रकरणात आणखी काहींचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, शहरातील तिवारी नामक सराईत गुन्हेगाराने सहारे याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संरक्षणासाठी ही काडतुसे आणण्यात आल्याचे बोलले जात आहे.