नागपूर : भारतीय हवामान खात्याने १५ नोव्हेंबरनंतर राज्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा इशारा दिला होता, पण हे काय..! आता १५ नोव्हेंबरला हुडहुडी भरवणारी थंडी नाही तर राज्यातील १५ जिल्ह्यांना पाऊस ओलाचिंब करुन जाणार आहे. एवढेच नाही तर वादळी वारा आणि विजांचा कडकडाट देखील होणार आहे.

मोसमी पावसाने निरोप घेतला आणि राज्यात उशिरा का होईना गुलाबी थंडीला सुरुवात झाली. मोसमी पाऊस परतीच्या वाटेवर असताना अवकाळी पावसाचे डोकावणे सुरुच होते. मात्र, अखेर दिवसा ऊन आणि सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत हलक्या थंडीला सुरुवात झाली होती. विशेषकरुन दिवाळीनंतर हवामानात प्रचंड वेगाने बदल होऊ लागले. राज्याच्या तापमानात चढउतार दिसून येत असतानाच हवेतील गारठा देखील वाढल्याचे जाणवत आहे. त्यामुळे राज्यात हुडहुडी भरवणारी थंडी लवकरच येणार असे संकेत हवामान खात्याने दिल्यानंतर गरम कपड्यांच्या खरेदीकडे देखील लोकांचा ओघ वाढू लागला होता. राज्यात खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होणार या आनंदात नागरिक असताना अवकाळी पावसाने डोके वर काढले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले. प्रामुख्याने शुक्रवार, १५ नोव्हेंबरला हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

हेही वाचा >>>“त्या नेत्यामुळे काँग्रेस सोडून भाजपात गेलो…” नाना पटोलेंनी पहिल्यांदाच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारपासूनच राज्याच्या दक्षिण भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, पालघर, मध्य महाराष्ट्र, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नगर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर यासह विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या १५ जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यादरम्यान वादळी वारा, विजांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंधप्रदेश आणि तामीळनाडू या दोन राज्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यादरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील किमान तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचे संकट असले तरीही थंडी मात्र पडणारच, हे किमान तापमानातील बदलावरुन स्पष्ट होत आहे.