नागपूर : भारतात तस्करीदरम्यान पकडलेल्या ‘ओरंगुटान’ या प्राण्याला इंडोनेशियात परत पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जामनगर येथील ‘वनतारा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झुऑलॉजीकल, रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ने वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेला याबाबत पत्र लिहिले आहे. हा प्राणी आधी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्र आणि त्यानंतर वनतारा येथे पाठवण्यात आला होता.
नोव्हेंबर २०२४ मध्ये कल्याणमधील एका इमारतीतून विदेशी वन्यप्राण्यांची तस्करी वनविभागाने उघडकीस आणली. यावेळी अनेक विदेशी वन्यप्राण्यांच्या प्रजाती जप्त करण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने उत्तर आणि मध्य अफ्रिकेत आढळणारे सहा बॉल पायथॉन, जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या अजगरापैकी एक असलेले गोल्डन चाइल्ड रेटिक्युलेटेड अजगर, एक सरडा, तीन पट्टे असणारे मातीत राहणारे कासव, एक भारतीय तारा कासव आणि एक इंडोनेशियातील सुमात्रा बेटांवर आणि बोर्नियोच्या इंडोनेशियन भागात आढळणारा ‘ओरंगुटान’ हे प्राणी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या सर्व प्राण्यांची रवानगी नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात करण्यात आली.
मात्र, मार्च २०२५ मध्ये ‘ग्रीन झुऑलॉजीकल, रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’ मध्ये या प्राण्याची रवानगी करण्यात आली. या निर्णयावर अनेक वन्यजीवप्रेमींनी नाराजी दर्शवली. या केंद्रात प्राणी गेल्यानंतर तो त्याच्या मूळ अधिवासात परत जाणार नाही, अशी भीती त्यांना होती.
माधुरी हत्तीच्या प्रकरणानंतर वनतारा अधिक चर्चेत हाेते. वनतारा येथे बेकायदेशीररित्या प्राणी आणले जात असल्याचे प्रकरण देखील न्यायालयात होते. न्यायालयाने मात्र वनताराच्या बाजूने निर्णय देत येथे कोणतेही प्राणी बेकायदेशिररित्या आणले जात नसल्याचा निकाल दिला. मात्र, आता ‘ग्रीन झुऑलॉजीकल, रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’चे संचालक डॉ. ब्रिजकिशोर गुप्ता यांनी वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेला लिहिलेल्या पत्रात ‘ओरंगुटान’ची प्रकृती आता स्थिर असून तो इंडोनेशियाला परत पाठवण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे, असे नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर हस्तांतरण प्रक्रियेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याला इंडोनेशियाला परत पाठवण्याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती देखील केली आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि संबंधित वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने प्रसिद्ध केलेल्या सर्व निर्देशांचे पूर्ण पालन करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत आणि आवश्यक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करू, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे ‘ओरंगुटान’ आता लवकरच इंडोनेशियात परत जाण्याचे संकेत मिळत आहेत.