नागपूर : जंगलातील जखमी वाघावर उपचार करायचे की त्याला निसर्गाच्या भरवशावर सोडून द्यायचे, या दोन परस्परविरोधी मतप्रवाहात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील गंभीररित्या जखमी वाघाचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. अतिशय धाडसी म्हणून ओळखला जाणारा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील हा वाघ गेल्या तीन आठवड्यापासून सुजलेल्या आणि चिरलेल्या पायासह जंगलात फिरत आहे. मध्यप्रदेशात अशा प्रकरणात धाडसी पाऊल उचलले जात असताना महाराष्ट्रात अजूनही वाघाच्या उपचारांवर प्रश्नचिन्ह आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन आठवड्यांपूर्वी ‘छोटा मटका’ या नावाने प्रसिद्ध वाघाची अधिवासासाठी ‘ब्रम्हा’ या नावाने प्रसिद्ध वाघाशी लढाई झाली. या लढाईत ‘ब्रम्हा’चा मृत्यू झाला तर ‘छोटा मटका’ गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या पायाला मोठा चिरा पडून सातत्याने त्यातून रक्त वाहत होते. लढाई झाल्यानंतर रक्ताळलेल्या पायासह तो पर्यटकांना दिसला. पर्यटकांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, उपचारासाठी त्याला ताब्यात घेण्याऐवजी निसर्गावर सोपवण्यात आले. अतिशय धाडसी असलेल्या या वाघाने यापूर्वीदेखील दोन वाघांना यमसदनी धाडले आहे. त्यावेळी तो नैसर्गिकरित्या ठीक झाला, पण यावेळी त्याच्या पायाची जखम अतिशय मोठी आहे. तब्बल तीन आठवडे होऊनही त्याला चालणे अशक्य आहे. त्यामुळे तब्बल आठ दिवस तो उपाशी होता. चार दिवसांपूर्वी त्याला आयते खाद्य पुरवण्यात आले. मात्र, त्याच्या पायाची जखम बघता पाय सडण्याची भीती पर्यटक आणि वन्यजीव अभ्यासक व्यक्त करत आहेत.

उपचार आवश्यकच

वाघ किंवा इतर प्राणी प्रत्येकवेळी नैसर्गिकरित्या ठीक होऊ शकत नाही. कातडीला जखम असेल आणि तो चालत असेल तर त्याला उपचाराची गरज नाही. मात्र, जखम खोलवर असेल, त्याला चालता येत नसेल तर अशावेळी त्याला उपचाराची नितांत गरज आहे. त्याला जागेवरच बेशुद्ध करून फ्रॅक्चर आहे किंवा नाही हे आधी तपासायला हवे. फ्रॅक्चर असेल तर त्याला जेरबंद करून उपचार करावे लागतील आणि नसेल तर वेदनाशामक औषध देऊन आणि प्राथमिक उपचार करून जंगलात सोडायला हवे, असे आजतागायत अनेक वाघांवर उपचार करणाऱ्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील ज्येष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्यप्रदेश आघाडीवर

मध्यप्रदेशातील कान्हा व्याघ्रप्रकल्पात ‘ज्युनियर बजरंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जखमी वाघाला तब्बल तीन दिवस हत्तीच्या सहाय्याने ट्रॅक करून जंगलातच उपचार करण्यात आले. तर ‘कॉलरवाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीवर देखील याच पद्धतीने उपचार करण्यात आले. मात्र, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात या वाघाला गंभीर जखमेतून बरे होण्यासाठी निसर्गाच्या भरवशावर सोडून देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच गरज नाही

जखमी वाघ किंवा वन्यप्राणी निसर्गातच बरे होतात. त्यामुळे हा वाघ देखील नैसर्गिकरित्या बरा होईल. त्याच्या पायातून रक्त येणे आता बंद झाले आहे आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज भासल्यास आम्ही त्याला उपचारासाठी जेरबंद करू, असे कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणाले