यवतमाळ : न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणे जास्त काळ प्रलंबित राहू नये, अशी सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे. अशा प्रकरणांचा न्यायालयाकडून सातत्याने आढावा देखील घेतला जातो. २० ते ३० वर्ष जूनी प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्याचे प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी वकिलांचे सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी केले.
वणी येथे आज रविवारी नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन व नवीन न्यायालयीन इमारतीच्या कोनशिला समारंभाप्रसंगी न्यायमूर्ती नितीन सांबरे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी, अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय देरकर, वणीचे पहिले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर जोंधळे, वणी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.विरेंद्र महाजन उपस्थित होते.
सुरुवातीस नवीन इमारत बांधकाम होत असलेल्या परसोडा येथील जागेवर न्यायमूर्तींच्या हस्ते कोनशिला अनावरण व भूमिपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर वणी शहरात नवीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी, वणी शहराचे साहित्य व सांस्कृतिक महत्व अधोरेखित केले. त्यासोबतच वणीचे ऐतिहासिक आणि औद्योगिक महत्वही त्यांनी सांगितले. पूर्वी वणी येथील नागरिकांना न्यायालयीन कामांसाठी केळापूर येथे जावे लागत होते. हे अंतर खूप जास्त आहे. मात्र आता वणीकरांचा हा त्रास कमी होईल. वणी येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीतून प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होईल, असे त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय भाषणात न्या. नागेश न्हावकर यांनी भारतीय संविधानाने उच्च मूल्य, परंपरा दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय त्या दिशेने ठामपणे वाटचाल करीत आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत जलदगतीने न्याय पोहोचला पाहिजे, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर देखील न्यायालयांमध्ये केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वणी वकील संघाचे अध्यक्ष अॅड विरेंद्र महाजन यांनी केले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वणी येथे न्यायालयाचे स्वप्न साकार होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पद्माकर जोंधळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर रेणूका पतंगे, ईशा धांडे यांच्यासह न्यायीक अधिकारी, वकील, सरकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.