नागपूर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहराची ‘क्राईम सीटी’ म्हणून राज्यात ओळख आहे. त्यात आता सर्वाधिक बालगुन्हेगारसुद्धा नागपुरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपराजधानीत ४६७ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल असून त्यात १४१ बालगुन्हेगार चोरीच्या गुन्ह्यातील आहे, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात जवळपास २२ गुन्हेगारांच्या टोळ्या होत्या. आता सध्या सर्व टोळीप्रमुख कारागृहात कोणत्यातरी गुन्ह्यात बंदिस्त आहेत. मात्र, मोठ्या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंकुश कसल्यानंतर आता बालगुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे.

हेही वाचा >>>नागपूर मेट्रोची सूत्रे आता मुंबईतून हलणार?

गेल्या १६ महिन्यांत नागपुरात ४१३ गुन्ह्यात बालगुन्हेगार सहभागी असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून समोर आले आहेत. सध्याच्या स्थितीत ४६७ बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल असून यापैकी काही बालगुन्हेगार आजही बालनिरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहेत. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातही बालगुन्हेगारांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. हत्याकांडासारख्या ९ गुन्ह्यात तब्बल १२ बालगुन्हेगारांचा सहभाग पोलिसांना आढळून आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>>वाशीम : बापचं निघाला वैरी! लेकीचे तुकडे करून खताच्या पोत्यात भरून फेकून दिले…

तसेच खून करण्याचा प्रयत्न करणे किंवा प्राणघातक हल्ला करण्याच्या २१ गुन्ह्यात २२ बालगुन्हेगार आढळून आले आहेत. काही बालगुन्हेगारसुद्धा आता टोळी करून गुन्हे करीत असल्याचे समोर आले असून एकमेकांना मारहाण करणे किंवा वस्तीत जाऊन धमकी देऊन मारहाण करून दहशत पसरविण्याचे १०८ गुन्हे दाखल असून त्यात ११६ बालगुन्हेगार आहेत. लुटमार करण्याच्या २३ घटना घडल्या असून त्यात २८ बालगुन्हेगारांचा समावेश आहे. या गुन्ह्यात सोनसाखळी हिसकावने, पाकिट मारणे, पैसे हिसकावून घेणे किंवा लुटमार करणे, अशा गुन्ह्याचा समावेश आहे. चोरीच्या १३१ गुन्ह्यात १४१ बालगुन्हेगारांचा समावेश आहे. घरफोडी करण्यातही ५५ गुन्हेगारांचा समावेश आहे.

दारु-गांजा आणि शौक

अल्पवयीन मुलांना वाईट संगत मिळाल्यानंतर गुन्हेगारीकडे वळतात. लहान वयातच दारु, गांजा, सिगारेट, व्हाईटनर, हुक्का अशा व्यसनाची सवय लागते. आपले शौक पूर्ण करण्यासाठी अल्पवयीन मुले चोरी, घरफोडी, लुटमार असे गुन्हे करून पैसे मिळवितात. दुचाकी, महागडे कपडे, शूज आणि स्टाईल करण्यासाठी झटपट पैसा कमावण्यातून मुले बालगुन्हेगारीकडे वळतात. यासाठी अनेकदा गरिबी, घरातील वातावरण, कौटुंबिक स्थिती, अनैतिक संबंध आणि संगत अशी कारणे समोर आली आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: ‘वंदे भारत’च्या प्रवाशांना ‘कार-टू-कोच प्रिमियम’ सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

बालगुन्हेगारीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या (४५५४) स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर मध्य प्रदेश (५६८४) तर तिसऱ्या स्थानावर राजस्थानचा (२७५७) क्रमांक लागतो. सध्या राज्यात ४ हजार ५५४ बालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईनंतर सर्वोधिक बालगुन्हेगार नागपूर शहरात आहेत. राज्यात बालगुन्हेगारांकडून सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. देशभरात ५ हजार ८९९ बालकांवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या घटनांमध्ये सर्वाधिक गुन्हे दिल्लीत नोंदविले गेले आहेत.