वर्धा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे व कोणतीही मदत करण्यास ते तत्पर असल्याने होत असल्याचे म्हटल्या जात असते.

२०१४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीट वाटपात महत्वाची भूमिका पार पाडली होती, असा दाखला दिल्या जात असतो. त्यामुळे अनेकांना आमदार, खासदार होण्याची संधी मिळाली. नवे नेतृत्व भाजपच्या राजकारणात उदयास आले. वर्धेचे आमदार व विद्यमान पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर हे त्यातील एक उदाहरण. आपला उदय नितीन गडकरी यांच्यामुळेच असे भोयर भाषणातून सांगत असतात. आताही त्यास उजाळा मिळाला.

स्नेहालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कांचन नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले की आपल्या सर्वांच्या आशिवार्दामुळे तीन वेळा आमदार व मंत्री होण्याची संधी मिळाली. आपल्या ऋृणातून मी कधीच उतराई होऊ शकत नाही. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तर माझ्यासाठी संकटमोचक राहिले आहे.

आपल्या या प्रेमापोटीच मला कार्य करण्याची उर्जा मिळते असते. स्नेहालयाचा परिसर नवीन उर्जा देणारा आहे, असे डॉ. भोयर म्हणाले. प्रभाग पाच स्नेहल नगर मधील स्नेहधाम येथील सुरक्षा भिंत व सौंदर्यीकरणासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ७५ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचा सत्कार स्नेहालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी कांचनताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहधामच्या अध्यक्ष डॉ. दिप्ती काशीकर, शारदा उत्सव समितीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना लांडगे, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश किटे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी नप उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, वर्धा विधानसभा प्रमुख प्रशांत बुर्ले, वर्धा विधानसभा अध्यक्ष निलेश पोहेकर, माजी नगरसेवक बंटी गोसावी, सौ. अर्चनाताई आगे, प्रियदर्शनी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष अॅड. शितलताई भोयर,श्रीमती लोहकरे, सुनिताताई हेडावू, स्वाती ठाकरे, ताराताई खंडाते, जगदीश टावरी, माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये पक्षाची टिकट मिळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. या कठीण प्रसंगी नितीन गडकरी हे ईश्वरासारखे मदतीला धावून आले. लोकनेते दत्ता मेघे यांचे देखील यात मोठे योगदान होते. मला आमदार बनविण्यात त्यांचे व आपले सर्वांचे मोठे योगदान आहे. स्नेहधामचा परिसर सुंदर असा परिसर आहे.स्नेहधाम मध्ये जेव्हा आलो तेव्हा येथून नवी उर्जा घेऊन गेलो आहे. उर्जा देण्याचे कार्य येथे होते.

राज्यमंत्री म्हणून विकासाच्या अनेक नवीन योजना अंमलात आणण्याची संधी मिळाली. स्नेहधामच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.या भागात विरोधक असताना देखील येथील लोकांनी मला आशिर्वाद दिले आहे. त्यांचे ऋण माझ्यावर आहे.

याप्रसंगी कांचनताई गडकरी यांनी देखील स्नेहधामच्या कार्याची स्तुती केली. जनतेच्या हिताचे कार्य केली की, जनता त्या नेत्याला कधीच विसरत नाही, असे त्या म्हणाल्या. केंद्रिय मंत्री गडकरी साहेब यांनी नेहमीच विकासाचे कार्य केले आहे. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची ओळख देश व विदेशात झाल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य ऐण्यात यावे, असे आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.