नागपूर : पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जामगडेच्या चौकशीसाठी काश्मीर पोलीस नागपुरात दाखल झाली असल्याची माहिती आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या संत कबीर नगर येथील रहिवासी सुनीता जमगडे काही दिवसांपूर्वी नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बेकायदेशीरपणे पाकिस्तानात गेल्या होत्या.
सुनीता कारगिलजवळील हुंडरमन गावातून पाकिस्तानच्या एका धार्मिक नेत्याला भेटण्यासाठी एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेल्या होत्या. भारताची सीमा पार करत पाकिस्तानात गेलेली सुनीता मागील आठवड्यात नागपुरात परत आली होती. दरम्यान, सुनीता जामगडे या महिलेला काश्मीर पोलीस तपासाकरता काश्मीरला ही घेऊन जाऊ शकतात, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर वॉरंट घेऊन ही कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
‘एनआए’कडूनही चौकशी
सुनीता नागपुरातून ४ मे रोजी काश्मीरला फिरायला जात आहे, असे सांगून नागपुरातून घरून निघाली होती. त्यानंतर १४ मे रोजी कारगिल पोलिसांकडून माहिती मिळाली होती की मुलाला सोडून ती पाकिस्तानला गेली. त्यानंतर पाकिस्तान प्रशासनाने तिला बीएसएफकडे सुपूर्द केले. बीएसएफकडून महिलेला ताब्यात घेतल्यानंतर अमृतसर पोलिसांना प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर नागपूरात आणण्यात आले. सध्या या प्रकरणी राष्ट्रीय एजन्सी ही तपास करत आहे.दरम्यान, सुनीताने गुगल मॅपच्या मदतीने एलओसी क्रॉस केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
त्यामुळे सुनीता जामगडेचा मोबाईल सध्या तपासण्यात येत आहे. मात्र त्यात मालवेअर असल्याच्या शक्यतेने सायबर टीम काळजीपूर्वक मोबाईलचा तपास करत आहे. या दरम्यान सुनीता दोन लोकांच्या संपर्कात होती. त्यांपैकी एक जुल्फीकार नावाचा व्यक्ती होता. एलओसी क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्या सुनिताची चौकशी एनआयएचे अधिकारी ही करणार आहे. २८ मे पासून नागपूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सुनीताने नागपूर पोलिसांना चौकशी दरम्यान फारसे सहकार्य केले नसल्याची माहिती असून आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
तपास यंत्रणांना शंका आहे की स्थानिक मदतीशिवाय सुनीता अवघ्या काही तासात एलओसी क्रॉस करून पाक व्याप्त काश्मीरमध्ये एवढ्या आतपर्यंत जाऊ शकत नाही. तिला काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर कोणी मदत केली याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. विशेष म्हणजे आपल्या अल्पवयीन मुलाला कारगिल जवळ सोडूनच सुनीताने सीमा पार केली होती. सुनीता यांचा पीसीआर २ जून रोजी संपला. त्यामुळे कपिल नगर पोलिसांनी सोमवारी जेएमएफसी न्यायालयाचे न्यायाधीश ए.यू. मोटे यांच्या न्यायालयात तिला हजर केले. त्यामुळे सुनीता यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.