नागपूर : आजच्या काळात संपत्तीच्या लालसेपोटी रक्ताच्या नात्यातही बरेच वाद होतात. परंतु, नागपुरातील एका कुटुंबाने याउलट समाजाला एक आदर्श घालून दिला आहे. या कुटुंबातील एका सावत्र बहिणीने मूत्रपिंड दान करून आपल्या बहिणीला जीवदान दिले. मेडिकलशी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ४ वर्षांनी हे प्रत्यारोपण झाले.
मूत्रपिंड दान करणारी लक्ष्मी (बदललेले नाव) ही महिला ५५ वर्षांची असून दानदाती बहीण ५० वर्षांची आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, २०१७ मध्ये रुग्णाला मूत्रपिंडाची समस्या असल्याचे पुढे आले. तिला डायलेसिस देणे सुरू झाले. डॉक्टरांकडून तिला मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला गेला. करोनामुळे हे शक्य झाले नाही.
हेही वाचा >>>पावसाचा जोर वाढताच बुरशीजन्य आजाराचे रुग्ण तिप्पट, नायटा, गजकर्णच्या रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे गर्दी
त्रास वाढल्यावर डॉक्टरांनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तिची सावत्र बहीण मूत्रपिंड दान करण्यासाठी पुढे आली. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पुढाकार घेत सुपररस्पेशालिटी रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. शेवटी गुरुवारी हे प्रत्यारोपण झाले. जिवंत व्यक्तीकडून प्राप्त मूत्रपिंडाचे येथे शेवटचे प्रत्यारोपण २०१९ मध्ये झाले होते. २०२१ मध्ये मेंदूमृत रुग्णाकडून मूत्रपिंड प्राप्त झाल्यावर एका रुग्णात प्रत्यारोपण केले गले. या नवीन प्रत्यारोपणामुळे सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पुन्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू झाल्याने गरीब रुग्णांना लाभ होणार आहे. या प्रक्रियेसाठी डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. भूषण महाजन, डॉ. महेश बोरीकर, डॉ. निखिलेश जिभकाटे, डॉ. प्रनल सहारे, डॉ. किशोर टोंगे, डॉ. वैभव, डॉ. विवेक, डॉ. सतीश दास, डॉ. कुणाल रामटेके, डॉ. पियुष किंमतकर, डॉ. शेफाली जुनेजा, डॉ. नीलिमा राय, डॉ. पंकज भोपाले यांनी सहकार्य केले.
हेही वाचा >>>खापरखेडा वीज केंद्राचा राख बंधारा फुटल्याने पर्यावरणवादी संतप्त, शेतकरी संकटात
“सुपरस्पेशालिटी रुग्णालयात गरीब व मध्यमवर्गीय रुग्ण उपचाराला येतात. करोनानंतर येथे मूत्रपिंड प्रत्यारोपण बंद झाल्याने रुग्णांना त्रास झाला. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मदत केल्याने पुन्हा प्रत्यारोपण सुरू झाले आहे. ”- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल.