नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना  शिवीगाळ केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकरचा जामीन अर्ज रद्द व्हावा, अशा मागणीचा अर्ज गुरुवारी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी वरच्या न्यायालयात जाऊ असे कालच सभागृहात सांगितले होते.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी  ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करीत तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने फोन करून थेट धमकी दिली. याबाबत सावंत यांनी फोनवरुन झालेला संवाद फेसबुकवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू, तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत ‘मुख्यमंत्र्याचा खास माणूस’ अशी  ओळख असणाऱ्या प्रशांत कोरटकरने सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली असा आरोप आहे. तसेच कोरटकर याने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले, या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच कोरटकरने जनतेची माफी मागण्याऐवजी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. त्यानंतर तो नागपूर पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक नागपुरात पोहचले. मात्र, काही पोलिसांच्याच मदतीने तो कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपून बसल्याची चर्चा होती. शेवटी कोल्हापूर पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दुसऱ्याच दिवशी कोरटकरची पत्नी पल्लवी हिने बेलतरोडी पोलीस ठाण्यात जीवाला धोका असल्याबाबत तक्रार दिली. तिसऱ्या दिवशी फरार असलेल्या कोरटकरचा मोबाईल आणि सीमकार्ड घेऊन पत्नी पल्लवी सायबर पोलीस ठाण्यात पोहचली. या सर्व घडामोडीमुळे गृहमंत्रालयाचा  आशीर्वाद कोरटकरवर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने ११ मार्च पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी त्याचा जामीन रद्द व्हावा, अशा मागणीचा अर्ज सरकारी वकिलामार्फत उच्च न्यायालयात दाखल करण्याची परवानगी मागितली होती. गुरुवारी दुपारी उच्च न्यायालयात कोल्हापूर पोलिसांनी अर्ज दाखल केला असून अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन रद्द व्हावा, यासाठी सरकारी वकिलामार्फत परवानगी मागितली आहे. गुरुवारी हा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. – संजयकुमार झाडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा पोलीस ठाणे)