नागपूर :राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर नागपूर चोऱ्या-माऱ्या करणाऱ्यांचे शहर बनत असताना नागपूर आता पांढरपेशी संघटीत गन्हेगारांचीही उपराजधनी बनत चालले आहे. उच्च शिक्षित अभियंतेच काय तर गृह खात्यातले कर्मचारीही आता मुख्यमंत्र्यांच्या शहरात सुरक्षित राहिलेले नाहीत. त्यामुळे राज्याची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरू आहे, हे गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांवरून वाटत आहे.
कुटुंबासोबत कपडे खरेदीसाठी गेलेला एक मर्चंट नेव्हीतील अभियंता सौरभ सुरंगळीकर यांच्यावर दुकानासमोर गाडी का लावली, म्हणून कायद्याचे रक्षक असलेल्या वकिलाने प्राणघातक हल्ला केला. तर पोलिसांत इमाने सेवा बजावणाऱ्या एका हवालदारावर तीन ऑटोमोबाईल व्यावयायिक बंधूंनी जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे हे शहर आता खाली मान घालून जगणाऱ्यांचे राहिलले नाही, हे स्पष्ट होत आहे. धक्कादायक म्हणजे मर्चंट नेव्हीत अभियंता असलेल्या तरुणाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत हल्ला करणाऱ्याचा स्पष्ट उल्लेख केलेला असतानाही पोलीसच हल्लेखोराना पाठीशी घालत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासही तयार नाही. एफआयआयरमध्ये हा हल्लेखोराचा पोलिसांनी अनोळखी असा उल्लेख केला आहे. त्यामुळे गृहखात्याच्याच कारभारावर संशय व्यक्त होत आहे.
गोकुळपेठेतील रहिवासी सौरभ सुरंगळीकर हे ३ मे पासून सुटीवर आहेत. त्यामुळे शुक्रवारी ११ जुलैला ते कपडे खरेदीरासाठी पत्नी रुहा, मुलगी हर्षदा व नोविकासोबत प्रतापनगर चौकातील चौधरी लाईफ स्टाईल दुकानात गेले होते. त्यांनी आपली कार रस्त्यावर लावली होती. त्याच वेळी वकीलाच्या ऑफिसमधून तिघेजण त्यांच्या अंगावर धावले आणि प्राणघातक हल्ला केला.
दुसऱ्या एका घटनेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी ऑटोमोबाईल दुकानात गेलेले पोलिस हवालदार संजय तुमसरे यांच्यावर दुकान चालविणाऱ्या अहिरकर बंधूंनी शिवीगाळ करीत वाद घालून हल्ला चढवला. प्राणघातक हल्ल्यांची मालिका इथेच थांबत नाही. अवैध सावकरी करणाऱ्या प्रविण भुरकेवार याने बांधकाम व्यावसायिक विशाल उरकुडे यांचे घरातून अपहरण करीत त्यांना फार्म हाऊसवर नेले. तिथे हातपाय बांधून उरकुडे यांना या तिघांनी बेदम मारहाण केली. उरकुडे यांनी सावकारी करणाऱ्या भुरकेवारकडून ३० लाख रुपये व्याजाने घेतले होते. यातील १४ लाखांची परतफेडही उरकुडे यांनी केली होती. उर्वरित थकलेल्या रकमेवरून दोघांत वाद सुरू होता. या घटनांचा तपशील पाहता मुख्यमंत्र्यांचे शहर गुन्हेगारांची राजधानी बनत चालले आहे,हे स्पष्ट होत आहे.