लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आल्यानंतर याच पद्धतीने इतर अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याच्या तक्रारी संबंधित विभागांना प्राप्त झाल्या. त्या तक्रारींची गंभीर दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने संशयितांची वैद्यकीय फेरतपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी, असे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

हा विषय दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू व स्टुडंट्स राईट असोसिएशनचे महेश बडे यांनी लावून धरला होता. बच्चू कडू यांनी तर १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध’ अभियानच राबवले. या अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेतील विविध विभागांमध्ये नियुक्ती मिळालेल्या एकूण ३५९ उमेदवारांची नावे समोर आली. सत्यता पडताळणीसाठी या संशयित उमेदवारांची दिव्यांगत्व फेरतपासणी करण्यात यावी व गैरप्रकार आढळल्यास सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. सोबतच या जागेवर प्रतीक्षा यादीतील दिव्यांग उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी, अशीही मागणी केली होती. यानंतर दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने कारवाई सुरू केली आहे.

आणखी वाचा-गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…

सूचना काय?

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील दिव्यांग उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची फेरतपासणी नियुक्त प्राधिकारी यांच्यामार्फत तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच संशयित उमेदवारांची यादीही पाठवण्यात आली आहे.

आमदार बच्चू कडू व स्टुडंट्स राईट असोसिएशन यांनी संशयित उमेदवारांची यादी दिली होती. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन संशयित दिव्यांग उमेदवारांची तपासणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. -प्रवीण पुरी, आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय.

आणखी वाचा-बँक घोटाळा प्रकरणात नवीन घडामोड… सुनील केदार यांची आता मौखिक सुनावणी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा खेडकर प्रकरण का गाजले होते?

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात पोहचले आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) हादरले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे. यूपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला आयएएस रद्द का करु नये? अशी नोटीस बजावली होती. वरिष्ठांच्या केबिनवर ताबा मिळवणे, खासगी गाडीवर लाल दिवा वापरणे, कोट्यावधींची संपत्ती असताना ओबीसी कोट्यातून यूपीएससी परीक्षा पास होणे, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे आयएएसपद मिळवणे, असे गंभीर आरोप पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आले आहेत.