चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी गावात शुक्रवारी (१९ सप्टेंबर) रोजी सकाळी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राजू आनंदराव सिडाम (३५) याची काही अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अवैध दारू विक्रीचा व्यवसाय किंवा मटणाच्या भाजीवरून वाद होऊन ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू सिडाम हा मोहाळी गावातील रहिवासी होता आणि अलीकडेच त्याने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गुरुवार, १८ सप्टेंबरच्या रात्री त्याच्या घरी काही अज्ञात मित्रांची पार्टी होती अशी माहिती आहे. त्यासाठी मटण आणले होते. याच जेवणावरून झालेल्या वादानंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर घरात कोणीही नव्हते.

राजू सिडाम हा त्याची पत्नी पुनम (वय ३०), मुलगा मेहरदीप (वय ८) आणि मुलगी वैष्णवी (वय ६) यांच्यासह मजुरीच्या कामासाठी वरोरा येथे राहत होता. मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्याने घरमालक त्याला जास्त काळ घरात ठेवत नव्हते. त्यामुळे तो पत्नीला वरोरा येथेच सोडून मूळ गावी सिंदेवाही तालुक्यातील मोहाळी येथे परत आला होता. त्याची पत्नी वरोरा येथील एका पेट्रोल पंपावर काम करते, तर मुलांचे शिक्षण तिथेच सुरू आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घरात शिजवलेले मटण आणि अन्न सापडले आहे आणि स्वयंपाकघरापासून बेडरूमपर्यंत रक्ताचे डाग आढळले आहेत. यामुळे मृतदेह फरफटत बेडरूममध्ये नेल्याचा पोलिसांचा संशय आहे. बेडरूममध्ये मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळले. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानपथकाने आरोपी पळून गेल्याच्या दिशेने काही अंतर जाऊन परत आले.

पोलिसांनी रात्री राजूच्या घरी आलेल्या अज्ञात लोकांची चौकशी सुरू केली आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करत आहेत. ही हत्या कोणत्या कारणास्तव आणि कोणी केली, याचा तपास पोलीस घेत आहेत. दरम्यान मृत राजू याने काही दिवसांपूर्वीच अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. अवैध दारू विक्रीच्या स्पर्धेतून तर ही हत्या झाली नाही ना अशीही शंका व्यक्त होत आहे.