यवतमाळातील कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ
यवतमाळ : राज्यातभरातील विविध जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद असलेल्या आंतरराज्यीय टोळीविरुद्घ अखेर मोक्का कारवाईची मोहर उमटविण्यात आली. अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ३० जून रोजी मकोका कारवाईच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली.अजयकुमार अशोकभाई तमंचे (४२,) , जिग्नेश उर्फ ग्निू दिनेश घासी (४४), सनी सुरेंद्र तमंचे (३३), मयूर दिनेश बजरंगे (४०) सर्व रा. कुबेरनगर, गुजरात, दीपक धिरूभाई बजरंगे (५२), रा. छारानगर, गुजरात, अशी आंतरराज्यीय टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
येथील लक्ष्मीनारायण प्रताप (५५) हे १७ मार्च रोजी सकाळी त्यांचा मुलगा सागर याच्यासह पंजाब नॅशलन बँकेत घराच्या बांधकामासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी आले होते. दोन लाख ७६ हजारांची रक्कम काढून दुचाकीने घराकडे परत जात असताना दुचाकीवर आलेल्यांनी लाथ मारून त्यांना खाली पाडले. लक्ष्मीनारायण प्रताप यांच्याकडील पिशवीत असलेली रोकड हिसकावून पळ काढला. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दरोड्याच्या प्रयत्नातील गुन्हा नोंद होवून गुजरात राज्यातील १० आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी पाच जणांचा यवतमाळ येथील गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हा हा संघटीत गुन्हेगारी टोळीने केलेला असल्याचे तपासात दिसून आले.
हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता
या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनयम १९९९ अन्वये कलम वाढीची परवानगी मिळण्यासाठी यवतमाळ शहर ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी तयार केलेला प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. सदर प्रास्तावास मंजुरी देण्यात आल्याने मकोका कायद्याचे कलम समाविष्ट करून पुढील तपास पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत, सपोनि जनार्दन खंडेराव, रवींद्र नेवारे, अंकुश फेंडर, पोलिस उपनिरीक्षक धनराज हाके, राजेश तिवारी, राहुल गोरे, उमेश पिसाळकर, राम पोपळघाट आदींनी केली.
हेही वाचा >>>मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचा शरद पवारांना पाठिंबा
गुजरात टोळीची राज्यात दहशत
गुजरातची ही टोळी आंतराज्यीय असून, त्यांच्याविरुद्घ राज्यातील नाशिक, पुणे, कोल्हापूर, मुंबई, संभाजीनगर, अहमदनगर, शेगाव, खामगाव, यासह कर्नाटक राज्यातही विविध ठिकाणी गुन्हे नोंद आहेत. चोरी, जबरी चोरी, दरोडा असे गुन्हे करण्यात सराईत आहे. त्यांच्या विरुद्घ गुन्ह्याची माहिती गोळा करून यवतमाळ येथे करण्यात आलेल्या गुन्ह्यात पहिल्यांदाच अशी मकोकासारखी कारवाई करण्यात आली. अशा संघटीत गुन्हेगारीतून दहशत पसरविणारे व संपत्तीविषयक गुन्हे करणार्यांवर यापुढेही मकोका तसेच एमपीडीए कायद्यातंर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असून, अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी दिला आहे.