चंद्रपूर: वंचित बहुजन आघाडीमध्ये पूर्व विदर्भ संयोजन प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे  माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे यांनी संयोजन प्रमुख पदासह वंचितच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे वंचितला पूर्व विदर्भात खिंडार पडले असून गजबे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रात माना समाजाचे नेतृत्व म्हणून डॉ. रमेशकुमार गजबे यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटविला आहे.

बहुजन समाज पार्टीकडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. युती शासनाच्या १९९५ ते १९९९ या कार्यकाळात काही महिने त्यांनी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. मागील विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून ते उमेदवार होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असलेली उद्दिष्टे व पक्ष विस्तारात यशस्वी होवू शकले नसल्याची जाणीव ठेवत यंदाच्या निवडणुकीत पक्षाला अपयश येवू नये, यासाठी पूर्व विदर्भ संयोजन प्रमुख व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>> बावनकुळेंच्या ताफ्यातील वाहने परस्परांवर आदळली, काय घडले ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतीय जनता पक्षात त्यांचा मंगळवारी प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉ. रमेशकुमार गजबे यांच्यामुळे भाजपाची ताकद वाढणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकी दरम्यान, भाजपात डॉ. गजबे यांचा प्रवेश होणार असल्याने चिमूर विधानसभेतील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.