वर्धा : शासकीय नोकरी म्हणजे सुवर्णसंधी. आयुष्याचे सार्थक. एकदा लागली की पाहायला नको. म्हणून या शासकीय नोकऱ्या साठी लाखो इच्छुक विविध तयारीस लागतात. आता जाहीर नोकरी तर विशेष प्रावीण्य असण्याची गरज नसणारी. ग्राम पातळीवार काम करण्याची तयारी असणाऱ्या युवकांसाठी ही संधी उत्तम म्हटल्या जाते. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही खुशखबर दिली आहे.
राज्यात १ हजार ७०० पेक्षा अधिक तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार असून भरती प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे मंत्री बावनकुळे सांगतात. कर्मचारी संघटनासोबत चर्चा करताना महसूल सेवकांना तलाठी भरती प्रक्रियेत राखीव जागा देण्याबाबत चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी पदे भरल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
डिसेंबर अखेरपर्यंत ही भरती प्रक्रिया सूरू होण्याचे सुतोवाच बावनकुळे यांनी केले आहे. यापूर्वी २०२३ मध्ये पार पडलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत काही गैरप्रकार झाल्याची तक्रार होती. नियुक्ती देतांना पेसा क्षेत्रातील पदाबाबत शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्याबाबत न्यायालयीन निर्णय प्रलंबित आहे. तरी पण शासनाने पेसा क्षेत्रातील इच्छुकांना ११ महिन्यासाठी नियुक्ती आदेश दिलेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निकष आहेत. महसूल सेवाकांची एक प्रमुख मागणी होती की त्यांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करून मानधन नव्हे तर वेतनश्रेणी मिळावी. या मागणीवर महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली. त्यात वेतनश्रेणी लागू करणे शक्य नसल्याने त्यांना तलाठी भरतीत काही जागा राखीव ठेवण्याचा आणि अनुभव ग्राह्य धरून अधिक गुण देण्याचा प्रस्ताव मात्र विचारधीन आहे . यावर सकारात्मक चर्चा शासन व संघटना पदाधिकारी यांच्यात झाली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवाकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पूढाकार घेण्याची खात्री दिली. या घडामोडी संबंधित संघटना चर्चेतून पुढे आल्या आहेत.
महसूल सेवक हा ग्राम पातळीवर काम करणारा शासनाचा महत्वाचा घटक म्हटल्या जात असतो. त्याच्या मार्फत गावातील विविध नोंदणी, अभिलेख अद्यावत करणे, सातबारा व अन्य जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असतात . अशी महत्वाची कामे पण केवळ मानधन मिळत आहे. त्यांना शासकीय कर्मचारी हा दर्जा मिळावा, म्हणून सातत्याने मागणी सूरू होती. त्यावर चर्चा झाली. पण सरसकट अशी मागणी शक्य नसल्याचे चित्र पुढे आले. तेव्हा या अशा मानधन तत्ववार काम करणाऱ्या महत्वाच्या कर्मचाऱ्यांना तलाठी पदात सामावून घेण्याचा मध्यममार्ग शोधण्यात आल्याचे या संदर्भात बोलल्या जात आहे.
