नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकद्वारे करण्यात आलेल्या स्थानिक निरीक्षण समितीच्या पाहणीत राज्यातील एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षकांची १०० टक्के पदे भरलेली नाहीत. एकूण महाविद्यालयातील १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर निम्म्याहून कमी शिक्षक कार्यरत असून राज्यात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निरीक्षणात काय? आढळले याबाबत आपण जाणून घेऊ या.

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचा २०२४-२५ साठीचा निरीक्षण अहवाल पुढे आला आहे. त्यानुसार, राज्यातील २५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील प्राध्यापक (प्रोफेसर), सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर), सहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर)च्या निरीक्षणात एकाही महाविद्यालयात १०० टक्के शिक्षकांची पदे भरली नसल्याचे पुढे आले आहे. एकूण महाविद्यालयांपैकी १० महाविद्यालयात तर निम्म्याहून कमी शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सेवेवरील शिक्षकांवर कामाचा ताण वाढत आहे.

मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती थोडी चांगली आहे. परंतु, रत्नागिरी (११.७६ टक्केच पदे भरलेली), परभणी (३४.१२ टक्केच पदे भरलेली), सातारा (४० टक्केच पदे भरलेली), सिंधुदुर्ग (४२.३५ टक्केच पदे भरलेली), गोंदिया (४४.२९ टक्केच पदे भरलेली), अलिबाग (४५ टक्केच पदे भरलेली), चंद्रपूर (४६.६३ टक्केच पदे भरलेली), जळगाव (५०.३० टक्केच पदे भरलेली), धाराशिव (५४ टक्केच पदे भरलेली), नंदूरबार (५४.२५ टक्केच पदे भरलेली) स्थिती वाईट आहे.

अधिकारी काय म्हणतात?

वैद्यकीय शिक्षण खात्यात महिनाभरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आणि कंत्राटी तत्वावर मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळणार आहेत. त्यामुळे अडचण दूर होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दिली. आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्याशी भ्रमनध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे म्हणणे काय?

शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी तातडीने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीपीसी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. समीर गोलावर यांनी व्यक्त केले.

सर्वाधिक शिक्षकांची पदे भरलेली महाविद्यालये

………………………………………………………………………………

महाविद्यालयाचे नाव/ जिल्हा             शिक्षकांची भरलेली पदे (टक्क्यांत )

……………………………………………………………………………….

छत्रपती संभाजीनगर                                     ९५.४२

जीएमसी, नागपूर                                     ९३.३९

ग्रॅन्ट मेडिकल काॅलेज, मुंबई                         ८९.३९

बी.जे. मेडिकल काॅलेज, पुणे                         ८६.४०

कोल्हापूर                                                ८३.७६

नांदेड                                                  ८३.७६

लातूर                                                  ८०.२८

मेयो, नागपूर                                      ७५.७०

अकोला                                                 ७२.१९

धुळे                                                   ७४.००