नागपूर: राज्यात २० टक्केच वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लागली आहे. तर १० टक्के वाहन धारकांनी ही पाटी लावण्यासाठी पैसे भरून वेळ घेतली असून तीही लवकरच लागेल. दरम्यान शिल्लक ७० टक्के वाहनांनी अद्याप पाटी लावण्याकडे पाठ दाखवली असून १५ ऑगस्टला पाटी लावण्याबाबत शेवटची मुदत आहे. त्यानंतर या वाहनांचे काय होणार? याबाबत आपण जाणून घेऊ या.

केंद्र सरकारने २०१९ पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) लावणे बंधनकारक केले आहे. ही पाटी लावण्याची मोहीम १ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. पाटी लावण्याचा नागरिकांचा खूपच संथ प्रतिसाद असल्याने आजपर्यंत पाटी लावण्यासाठी परिवहन खात्याने तीनदा मुदतवाढ दिली आहे. मागच्या महिन्यात मुदतवाढ मिळाल्यावरही पाटी लावण्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्यात मागील सात महिन्यांचा कालावधीत १९.५७ टक्के वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यात आलेली आहे.

दरम्यान परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पुण्यात ११ व १२ ऑगस्ट अशी दोन दिवस राज्यभरातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. या बैठकीत फिटमेंट सेंटर वाढविण्याची, ‘एचएसआरपी’ बसविण्यात वाहनचालकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या आणि जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. परंतु, मुदत वाढीबाबत काहीच बोलले नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे परिवहन खाते ही पाटी राज्यातील सगळ्याच वाहनांना बसवण्यासाठी आता काय उपाय करणार? याकडे परिवहन क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.

पाटी बसवण्यात कोणते जिल्हे पुढे ?

राज्यात उच्च सुरक्षा क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यात सिंधुदुर्ग (एमएच ०८) प्रथम क्रमांकावर असल्याची सूत्रांची माहिती आहे, तेथे ३३ टक्के वाहनांनी ही प्लेट बसवली आहे. त्यानंतर वर्धा (एमएच ३२), नागपूर ग्रामीण (एमएच ४०), सातारा (एमएच ११) आणि गडचिरोली (एमएच ३३) या आरटीओ कार्यालयांचा क्रमांक लागतो.

तीन दिवसांत किती वाहनांच्या पाट्या बसवल्या जाणार?

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची दोन कोटी ५४ लाख ९० हजार १५९ जुनी वाहने आहेत. यातील केवळ ४९ लाख ८९ हजार ६५६ वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत पैसे भरून वेळ घेतलेल्या १० टक्के वाहनांना ही पाटी लावली जाईल. परंतु शिल्लक दोन दिवसांत ७० टक्के वाहनांना कशा पद्धतीने पाटी लावली जाईल? याकडे या क्षेत्रातील जाणकाराचे लक्ष लागले आहे.