महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकारने घेतला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, “ मी अगोदरच सांगितलं आहे की जेवढी जागा मराठी माणूस म्हणतोय की आमच्याकडे आली पाहिजे, तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे ती इंच ना इंच जागा आम्ही घेणार, ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे? देवळातली घंटा आहे का वाजवायची?”

याचबरोबर, “तिथे जर सगळ्यांना थांबवलेलं असेल, कोणी एकमेकाला अपशब्द वापरू नका म्हटले, एकमेकाच्या राज्यातील लोकांना येण्याजाण्यास कोणी अडवू नका असं सांगितलं. बंधन घालू नका असं सांगितलं. कोणत्याही मराठी भाषिकांच्या गाड्या तोडूफोडू नका? असं सांगितलं, असं होऊनदेखील पुन्हा येरे माझ्या मागल्याच चालेलं आहे. पुन्हा ते त्या पद्धतीनेच ठराव करत आहेत. हे आताच्या शिंदे-फडणवीस सरकारचं अपयश आहे. हे कशामुळे घाबरत आहेत, कशामुळे ठराव करत नाहीत? कशामुळे आक्रमकपणे महाराष्ट्रातील जो भाग तिथे मराठी माणूस राहतोय आणि वर्षानुवर्षे पिढ्यांपिढ्या झगडतोय, त्यांना दिलासा देण्याचं काम हे सरकार करत नाही. अशा प्रकारचं एकंदरित चित्र आहे.” असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – “सत्तेचा दुरुपयोग करत एका मुलीवर अत्याचार करून, तिची हत्या करणे हा पुरुषार्थ आहे का? चौकशी होऊ द्या मग समजेल”

याशिवाय, “मी कर्नाटक सरकारने केलेल्या ठरावाची तीव्र निषेध करतो, आमच्या सगळ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही यामध्ये बोटचेपेपणाचं धोरण घेत आहेत, आक्रमक राहत नाहीत. त्यांनीही दोष देतो की, हे कुठंतरी महाराष्ट्राचं समर्थन करण्यात कमी पडत आहेत, हे यांचं अपयश आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे.” असं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा – “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा; ३२ वर्षांच्या आमच्या कोवळ्या मित्राने…” नितेश राणेंचं विधान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही अजिबात सीमवाद तयार केलेला नव्हता… –

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर सीमावादावरून होणाऱ्या टीकेलाही अजित पवारांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही अजिबात सीमवाद तयार केलेला नव्हता, सगळ्यांना माहीत आहे की कर्नाटकातील एका संघटनेने झेंडे वर काढून आंदोलन केलेलं होतं. त्यातून जत तालुक्यातील काही गावांनी आम्हाला जर विकासकामांना निधी देणार नसतील, आमचे प्रश्न सोडवणार नसतील तर मग आम्हाला कर्नाटकात जायचं अशाप्रकारची चर्चा सुरू केली. मात्र यांनी(सत्ताधाऱ्यांनी) कारण नसताना लक्ष विचलित करण्यासाठी सांगितलं की यामागचा सूत्रधार दुसरा कोणतरी आहे आणि ते संघटनांच्या बैठका घेताय व लोकांच्या भावना भडकवत आहे. मात्र वास्तविक अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रातील कुठल्या विरोधी पक्षाशी संबंधित असणाऱ्या संघटना करणार नाही किंवा पक्ष करणार नाही, याबाबत मला ठाम विश्वास आहे. महाविकास आघाडीमधील घटक तर अजिबात या गोष्टी करणार नाहीत, या बद्दल आम्हाला खात्री आहे.” असं अजित पवार यांनी सांगितलं.