वर्धा : राज्यातील नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यात आणि उत्साहास उधाण आल्याचे चित्र राज्यभर प्रकटले. ७ वर्षापासून प्रतिक्षा होती. केव्हा निवडणुका लागणार आणि मी नगरसेवक होणार, अशी तळमळ अनेकात होती. शेवटी निवडणूक कार्यक्रम आला आणि सगळे संभाव्य कामाला लागले. पण निवडणूक कार्यक्रम पाहून पेचात पण पडले. कारण प्रचारासाठी मिळणार अवघे काहीच दिवस.

निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर ही आहे. छाननी १८ नोव्हेंबरला होणार. २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २६ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. २ ला मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम आहे. २६ नोव्हेंबर रोजी चिन्हासह अधिकृत वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर खरी रंगत येणार.

पण हाच कालावधी कळीचा ठरणार आणि त्यात काय काय करणार, असा प्रश्न संभाव्य उमेदवारांना पडला आहे. सत्ताधारी तीन व विरोधी तीन पक्ष व त्याशिवाय अन्य काही पक्ष आणि अपक्ष पंगतीत राहणारच. किमान एका वॉर्डात दहा ते पंधरा उमेदवार उभे राहण्याची शक्यता. या सर्वांची प्रचार साहित्य तयार करून देणारी खाजगी व्यावसायिक यंत्रणा मोजकीच. म्हणजे २६ ला सायंकाळी चिन्ह मिळणार. त्यानंतर माझे हे चिन्ह हे सांगण्याची तयारी सूरू करावी लागणार.

बॅनर, पोस्टर, बिल्ले व अनुषंगिक साहित्य छापून देणारे व्यावसायिक मोजकेच म्हणून वेळेवर हे साहित्य मिळण्याची शक्यता कमीच. म्हणजे २८ नोव्हेंबर पर्यंत हे प्रचार साहित्य हाती घेऊन वाटप करावे लागणार. २९, ३० हे दोनच दिवस खरे प्रचारास मिळणार. कारण १ तारखेस प्रचारबंदी लागू होईल. या दोन दिवसात उमेदवार व त्याचा पक्ष कसा व कुठवर प्रचार करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पक्षाची तिकीट आधीच पक्की होण्याचे दिवस आता कोणत्याच पक्षात राहले नाही. वेळेवर उमेदवारी व मग चिन्ह मिळणार. अश्या परिस्थितीत प्रत्येक मतदारांना भेटण्याचे मोठे आव्हान घेऊन ही नेतेमंडळी डोक्यावर हात ठेवून बसली आहे.

एक माजी नगरसेवक म्हणतो की यापूर्वी किमान १५ दिवस प्रचार करण्यास मिळत होते. आता प्रचार करण्यास केवळ तीन दिवस मिळणार. तयारी पूर्वीपासून करणारे आहेत. पण पक्षाची तिकीट मिळणे व नं मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी ठेवावी लागणार . यात हाती काहीच तास लागणार. वेळेवर काम दिले म्हणून प्रिंटिंग व्यावसायिक चढे दर लावणार. हे असे प्रचार साहित्याचे व त्यापूर्वी निवडणुकीस उभे राहायचे म्हणून केलेले खर्च, आवक्याबाहेर ठरत असल्याची भावना माजी नगरसेवक व्यक्त करीत आहे.