नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) बळकट करण्याचे आश्वासन दिले खरे परंतु, सातत्याने रखडत चाललेले निकाल, परीक्षा, निवड प्रक्रिया आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी चिंताग्रस्त झाला आहे.
मात्र, आयोगाने यावर उपाय शोधला आहे. सरकारने तीन सदस्यांची नियुक्ती केली असून यामुळे एमपीएससी बळकट होणार आहे. तसेच निकाल आणि नियुक्तीच्या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. राजीव निवतकर, दिलीप भुजबळ आणि महेंद्र वारभुवन यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. राज्यातील लाखो युवक, विद्यार्थी एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करत असतात.
मात्र, अनेकदा एमपीएससीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्याने या स्पर्धा परीक्षा व नियुक्तीला उशीर होत होता. ‘ एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत.
या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात होती. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरली आहेत. यामुळे आयोगातील सदस्यांची संख्या आता तीन वरून सहा झाली आहे.
असे आहेत सहा सदस्य
(१) रजनीश शेठ
(२) अभय वाघ
(३) सतीश माधव देशपांडे
(४) राजीव निवतकर
(५) डॉ. दिलीप भुजबळ- पाटील
(६) महेन्द्र वारभुवन