यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर पडले आहे. आई, वडील, पत्नी, मुले सर्वच प्रचारात व्यस्त आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघात पूर्वी नाईक बंगल्यातील उमेदवारांना प्रचारासाठी फिरायची गरज नसायची. नाईक कुटुंबातील उमेदवार घरी बसून हमखास विजयी होणार असे समीकरण असायचे. मात्र आता नाईक कुटुंबातील उमेदवारासोबत त्यांचे कुटुंबीयसुद्धा प्रचारासाठी फिरत आहे. पुसद मतदारसंघातील महायुतीचे तरूण उमेदवार इंद्रनील नाईक यांच्या सहचारिणी मोहिनी नाईक या शहर आणि ग्रामीण भागात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मोहिनी नाईक या गुजरातमधील आहेत. त्यांचे वडील गुजरातच्या गृहविभागात आयपीएस अधिकारी होते. नाईक बंगल्यावर दररोज शेकडो नागरिक तक्रारी, अडचणी घेऊन येतात. त्यांना माझे सासरे मनोहरराव नाईक, पती आमदार इंद्रनील नाईक सर्वतोपरी मदत करतात, हे मी बघत आले आहे. त्यामुळे नाईक कुटुंबाची सून म्हणून येथे आल्यानंतर माझी सामाजिक जबाबदारी वाढली आहे, असे मोहिनी नाईक म्हणाल्या. पहाटे पाच वाजतापासून दिनचर्या सुरू होवून रात्री उशिरापर्यंत त्या मतदारांशी सवांद साधत आहेत. या निमित्ताने मतदारसंघातील महिला आणि तरूणींशी संवादातून महिलांचे अनेक प्रश्न कळत आहेत. महिला माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. भविष्यात यावर नक्कीच ठोस काम करू, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

दिग्रस मतदारसंघात संजय राठोड गेल्या २० वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत आहेत. रुग्णसेवेपासून समाजकार्यास सुरूवात करून त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. त्यांच्या रूग्णसेवेच्या कार्यात पत्नी शीतल राठोड या प्रारंभीपासूनच सहभागी आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्या पती संजय राठोड यांच्यासोबत प्रचारासाठी घराबाहेर पडतात. विशेषत: मतदारसंघातील महिला, तरूणी लहान मुलं यांच्याशी वैयक्तिक संवाद साधण्यावर त्या भर देतात. सकाळीच घराबाहेर पडून दररोज आठ ते १० गावांमध्ये कॉर्नर सभा, वैयक्तिक भेटी घेत फिरत आहेत. ‘वहिनी’ म्हणून त्या मतदारसंघात परिचित आहेत. याशिवाय संजय राठोड यांचा मुलगा सोहम यावेळी पहिल्यांदाच युवासेनेच्या माध्यमातून गावोगावी तरूणांशी संवाद साधून प्रचार करत आहे. मुलगी दामिनी ही सुद्धा प्रचारासाठी आली असून मतदारसंघात तरूणींसोबत सक्रिय झाली आहे. त्यामुळे संपूर्ण राठोड कुटुंबीय सध्या प्रचारात व्यस्त आहे.

हेही वाचा : ‘अकोला पश्चिम’मध्ये भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक वॉर; नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय दिग्रस मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार माणिकराव ठाकरे यांच्या सुना वृषाली राहुल ठाकरे, नेहा अतुल ठाकरे यासुद्धा प्रचारात सक्रिय आहेत. यवतमाळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार बाळासाहेब मांगुळकर यांच्या सहचारिणी कल्पना मांगुळकर यांनीही महिला मतदारांशी संवादावर भर दिला आहे. एकुणच बहुतांश उमदेवारांचे कुटुंब सध्या प्रचारात रमले आहे.