Nagpur Today Weather Forecast : विश्रांतीनंतर पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोर धरला आहे. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. तर आता पुन्हा हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे.

बंगालच्या उपसगरासमवेत अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील घाटमाथ्यावरील परिसरासह मुंबई, कोकणातील काही भागांना “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. राज्यात मधल्या काळात पावसाने विश्रांती घेतली होती. आता विश्रांतीनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले असून त्याचा बहुतांश परिणाम, मराठवाडा, विदर्भात पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे फक्त राज्य नव्हे, तर देशातही अनेक ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली आहे आणि जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रविवारी रात्रीपासूनच पावसाचा जोरदार सुरुवात झाली विजांच्या कडकडाटामुले शहरातील बहुतांश भागांमध्ये सोमवार, १५ सप्टेंबरला सुद्धा जणू नवा दिवस उजाडलात नाही इतका काळोख पाहायला मिळाला. त्यामुळे आता परतलेला हा पाऊस आता नेमका किती दिवस मुक्कामी राहतो हाच प्रश्न नागरिकांच्या मनात घर करू लागला आहे. दरम्यान रविवारी रात्री उशिरा हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांसह पुण्यासाठीसुद्धा जोरदार पावसाचा इशारा जारी केला होता.

ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यांसह उत्तर कोकणापासून गोव्यापर्यंत आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. यादरम्यान मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती असेल. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही दुर्गम भागांमध्ये पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे यांदरम्यान नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासह हिमाचल, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडसह उत्तर प्रदेशातही पावसाने थैमान घातले आहे. खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आलीये. पुढील आदेशापर्यंत यात्रा सुरु होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तिथं उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये अचानक पूर आला असल्यानं रस्त्यांनादेखील नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे.