नागपूर : विदर्भात मागील आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. तब्बल चार दिवस पावसाने विदर्भात मुक्काम ठोकला आणि त्यामुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता राज्यातील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत.
मागील आठवड्यात कोकणसह विदर्भात मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मागील तीन-चार दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर ओसरला होता. विदर्भात देखील पावसाचा जोर ओसरला असून सुर्यनारायनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे हळूहळू उकाडा जाणवायला लागला आहे. येत्या २४ तासांत राज्यातील १२ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. येत्या २४ तासात कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने २४ तासांसाठी “यलो अलर्ट” जारी केला आहे. त्यानंतर पुन्हा पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.
राजधानीत काय अंदाज…
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी आकाश ढगाळ राहील. तर अधुनमधून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तर महाराष्ट्राची स्थिती काय…
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, आणि नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना “यलो अलर्ट” दिला असून जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अंदाज काय…
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर मध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.
मराठवड्यातही…
मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. इतर जिल्ह्यांना आज कोणताही सतर्कतेचा इशारा नाही.
विदर्भातून काढता पाय..
विदर्भातून पावसाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे विदर्भात सामान्यतः ढकळ आकाश राहणार असून पावसाची उघडी पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.