नागपूर : भारतीय हवामान खात्याने विदर्भात येत्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २४ तासात चंद्रपूर आणि गडचिरोलीसह मुसळधार ते अतिमूसळधार पावसाचा अंदाज दिला असून याठिकाणी “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून नागपूर शहर आणि परिसरात पावसाने ठाण मांडले आहे.
पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यानजिकच्या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याच्या प्रभावामुळे मध्य भारत तसंच कोकण, घाट प्रदेश आणि विदर्भात पुढचे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस कुठे ?
सात जुलैला चंद्रपूर, गडचिराेली व गाेंदियात अतिमूसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय नागपूर, भंडारा, वर्धा व अमरावती जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर आठ जुलैला नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचे सत्र कायम राहिल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. वीजा आणि ढगांचा कडकडाट देखील यावेळी होण्याची शक्यता आहे.
राज्याची स्थिती काय?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यतील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर परिसरातील घाटमाथा परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बीड, लातूर, धाराशिव या तीन जिल्ह्यांत वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण विभागात ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.