नागपूर : मानव-वन्यजीव संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात राज्याचे वनखाते सपशेल अपयशी ठरले आहे. वाढत्या संघर्षांबरोबर मानवी मृत्यूचा आलेख आणि वाघाच्या जेरबंदीचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या सहा वर्षांत वनखात्याने सुमारे ३५ वाघ जेरबंद केले. या वाघांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, समितीसमोर येणाऱ्या प्रकरणांचे प्रमाणच कमी असल्याने हे वाघ कायमस्वरूपी जेरबंद झाले आहेत.
राज्यात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. चंद्रपूरपाठोपाठ गडचिरोली, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातदेखील संघर्ष वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातूनही वाघाच्या जेरबंदीचे प्रमाण वाढल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. जेरबंद वाघांना नैसर्गिक अधिवासात सोडायचे की प्राणिसंग्रहालयात पाठवायचे यावर निर्णय घेण्यासाठी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. वाघ जेरबंद केल्यानंतर त्यामागची कारणे आणि कागदपत्रे तातडीने समितीसमोर ठेवली जाणे अपेक्षित असते. वाघाचा दोष नसल्याचे सिद्ध झाल्यास त्याला तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडण्याची किंवा वाघ जबाबदार असल्यास प्राणिसंग्रहालयाकडे सोपवण्याची शिफारस समिती करते. मात्र, या समितीसमोर अशी प्रकरणे येतच नाहीत किंवा आली तरी बराच उशीर झालेला असतो. या दीर्घ कालावधीत वाघ मानवी सहवासात असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडता येत नाही. परिणामी, तो कायमचा जेरबंदच राहतो. ही समिती मुळात आईपासून दुरावलेल्या वाघांच्या बछड्यांबाबत निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर याच समितीकडे जेरबंद वाघांच्या सुटकेसंदर्भात सूचना देण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली. मध्यप्रदेशचे वनखाते मात्र जेरबंद वाघांच्या सुटकेसंदर्भात तातडीने निर्णय घेते. महाराष्ट्रात या प्रक्रियेला होणारा उशीर या वाघाच्या कायमस्वरूपी जेरबंदीचे कारण ठरत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक
चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वाधिक १९ वाघ जेरबंद करण्यात आले. यात ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील दहा, चंद्रपूर वनक्षेत्रातील सात तर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील दोन वाघांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनक्षेत्रातून पाच, भंडारा जिल्ह्यातून तीन, यवतमाळ जिल्ह्यातून दोन, गोंदिया जिल्ह्यातून दोन व नागपूर जिल्ह्यातून दोन वाघ जेरबंद करण्यात आले. या वाघांपैकी तब्बल २४ वाघ नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात पाठवण्यात आले आहेत.